- मंगेश कराळे नालासोपारा : वसई विरारकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने एमएमआरडीएच्या माध्यमातून सुर्याच्या नवीन योजनेतून वसई विरार शहराला १८५ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. फक्त पीएम, सीएम, मंत्र्यांना या योजनेच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने वसईकरांना पाणी मिळत नाही. यामुळे वसईकरांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनसेकडून राज्य शासन, एमएमआरडीएला ४ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. अन्यथा या पाण्याचे उदघाटन जाहीर करा, अन्यथा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी उदघाटन करणार आहे, यासाठी गुन्हे अंगावर घेण्यास तयार असल्याचे मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी सांगितले.
३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पाण्याचे उदघाटन होणार होते म्हणून काही बातम्या प्रसिध्द झाल्या. पण मोदींचा असा कोणताही प्रोग्राम नसल्याचे अविनाश जाधवांनी सांगितले. याबाबत मनपा आयुक्त अनिलकुमार पवार यांनाही माहीत नसल्याचे धक्कादायक माहिती त्यांनी दिली. खासदार व काही नेत्यांनी पाण्यासाठी मोर्चे काढून त्यात नागरिकांची दिशाभूल करून उदघाटनाची तारीख कशी काय सांगितली ? १३५० कोटींचे कंत्राट २३०० करोडवर गेल्याने १ हजार कोटींचे वाढलेले पाप कोणाचे? पाणी वसईत नागरिकांना मिळू नये यासाठी कोणी प्रयत्न केले?
सत्ताधारी पाण्यासाठी मोर्चा का काढत नसून गप्प का आहेत? योजनेचे काम व सर्व पाण्याच्या चाचण्या पूर्ण होऊनही सत्ताधारी व मनपाने १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी वसईकरांना पाणी देऊन स्वातंत्र्य द्यायला पाहिजे होते. मनपा जर पाणी देऊ शकत नाही तर दोन ते अडीच वर्षांपासून नळाचे कनेक्शनचे पैसे का घेतले ? पाण्याचा साठा उपलब्ध नसतानाही टोलेगंज इमारतींना परवानगी का देत आहे ? पाण्याच्या उदघाटनासाठी कोणत्या नेत्यांची काय गरज आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित करून घणाघाती आरोप केला आहे.
पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयावर पाण्यासाठी विराट महामोर्चा काढणार आहे. यासाठी शर्मिला राज ठाकरे सहभागी होऊन विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
खासदारांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करणारपाण्यासाठी मोर्चा काढून सभेत खासदार राजेंद्र गावित यांनी ३० ऑक्टोबरची तारीख कशी काय घोषणा केली ? मोर्चा काढून ढोंगीपणा करत तारीख जाहीर करून उदघाटन का लांबले ? पंतप्रधानांचा उदघाटनाचा कार्यक्रम दाखवावा आणि जर त्यात हा कार्यक्रम नसेल तर खासदारांनी जाहीर माफी मागावी. लोकांची फसवणूक करणाऱ्या खासदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.