- रवींद्र साळवे
मोखाडा : तालुकाच नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या पुरवठ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र असून, वाहतुकीचा खर्च वाचविण्यासाठी पोषण आहारातील कच्च्या मालाचा पुरवठा एक किंवा दोन महिन्याचा करावयाचा सोडून शाळांना मात्र तीन ते चार महिन्यांचा धान्य पुरवठा एकदाच केला जातो. यामुळे कालांतराने तांदळात जाळ्या होतात, हरभरा-वाटाणे हे कडधान्य आतून किडलेले असते. यामुळे विद्यार्थ्यांना हे धान्य शिजवून देताना शिक्षक आणि बचतगटांची चांगलीच पंचाईत होताना दिसत आहे.
प्रशासनाचे अधिकारी संबंधित ठेकेदाराला सांभाळून घेतात. त्यामुळे शिक्षकही तक्रार कोठे करावी आणि अधिकारी वर्गाचा रोष कसा पत्करायचा, या विवंचनेत असल्यामुळे हा पुरवठ्याचा घोळ राजरोसपणे सुरूच आहे. यामुळे नियमाला धरून धान्य न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नमध्यान्ह भोजन योजनेसाठी पोषण आहाराचा पुरवठा होत असतो. यामध्ये तांदूळ, तेल, हरभरा, वाटाणा यासोबतच अनेक मसाले पाकीट वगैरे धान्यांचा पुरवठा होतो, मात्र या पुरवठ्याबाबत अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासमोरच अडचणींचा पाडा मांडला.
प्रमाणित वजनकाट्याऐवजी हातकाट्याचा वापर
तांदूळ कधीच मोजून दिला जात नाही, मात्र प्रत्येक गोणीत तांदूळ हा अपेक्षित वजनापेक्षा कमी असल्याचे दिसून येते. याशिवाय बाकी धान्य मोजण्यासाठी प्रमाणित केलेले वजनकाटे न वापरता थेट हातकाट्याचा वापर केला जातो. यामुळे बाकी धान्याच्याही मापात पाप होत असल्याचे निर्दशनास आले आहे.
धान्याचा पुरवठा शासन नियमांनुसार दर १ किंवा २ महिन्याला करावयाचा असतो. त्यासाठीची तरतूदही शासन करत असते, मात्र संबंधित ठेकेदार आपल्या वाहतुकीचे पैसे वाचावेत म्हणून जवळपास तीन-चार महिन्यांचा धान्य पुरवठा एकदाच करून मोकळा होतो. यामुळे कालांतराने या धान्याला कीड लागते, अशा तक्रारी आहेत.
शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मी शिक्षकांना आवाहन करतो की, महिन्याचा माल घ्यावा, धान्य दर्जा आणि वजन बघूनच माल स्वीकारावा. तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. थेट माझ्याकडे तक्रारी केल्या तरी चालतील.- प्रकाश निकम, अध्यक्ष, पालघर जिल्हा परिषद