नालासोपारा : - पूर्वेकडील संकेश्वर नगर येथील साफल्य नावाची चार मजली इमारत अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. ही इमारत दहा वर्ष जुनी असून मंगळवारी मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळला. इमारत कोसळत असल्याच्या आवाजाने इमारतीमधील रहिवासी जागे झाले आणि खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली. मात्र सर्व रहिवासी इमारतीतून बाहेर येताच अवघ्या काही क्षणातच ही इमारत पत्याप्रमाणे कोसळली.
इमारतींमधील रहिवाशी बाहेर आल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र इमारतीतील रहिवाशांचे संसार ढिगाऱ्याखाली येऊन त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील महाड येथे इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडली होती. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली हाेती. या दुर्घटनेत १६ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. तर ९ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची जबाबदारी असणारे विकासक (बिल्डर) फारुक काझी, आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तू विशारद गाैरव शहा, महाड नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी दिपक जिंजाड, तत्कालीन अभियंता शशिकांत दिघे आणि युनूस अब्दुल रज्जाक शेख यांच्यावर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.