- वसंत भोईरवाडा - वनविभागातील पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल एच.व्ही सापळे व त्यांच्या इतर सहकऱ्यांनी वाड्यातील एका दास्तान डेपोवर धाड टाकली. या धाडीत या डेपोमध्ये विना परवाना लपवून ठेवलेला जवळपास ५० ते ६० ट्रक साग, खैर व इतर इंजाली असा १०१२ घनमीटर लाकूड साठा जप्त करु न तीन आरोपींना ताब्यात घेतले. जप्त केलेल्या संपूर्ण लाकडांची किंमत ४० लाखाहून अधिक असल्याचे वन अधिकाºयांकडून सांगण्यात येत आहे.वाडा-मनोर या राज्य महामार्गालगत ठाणगे पाडा येथे असलेल्या एका दास्तान डेपोत विना परवाना लाकडाचा मोठा साठा असल्याची खबर वाडा पश्चिम विभागाचे वनक्षेत्रपाल सापळे यांना महिनाभरापुर्वीच मिळाली होती. त्यांनी या दास्तान डेपोला २० जुलै २०१८ रोजी सील केले, व पुढील तपास सुरु केला. या तपासात या दास्तान डेपोवर या डेपोपासूनच अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आलमान गावातील काही शेतकºयांच्या खाजगी मालकीतील साग, खैर व इतर इंजाली झाडे विनापरवाना तोडून त्याचा साठा ठाणगेपाडा येथील सुनील आंबवणे यांच्या मालकीच्या दास्तान डेपोवर ठेवण्यात आला होता.या प्रकरणी या दास्तान डेपोचे मालक सुनील आंबवणे रा. वाडा, राजू शिलोत्री रा. पोशेरी, व रमेश पाटील रा. पालसई या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरील आरोपींची वाडा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.दोन महिने वनविभागाचा कानाडोळावाडा वनविभागाच्या कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या या दास्तान डेपोवर गेल्या दोनच महिन्यात ५० ते ६० ट्रक विनापरवाना साग, खैर व इतर इंजाली किंमती लाकडांचा साठा होत असतानाही येथील वन आधिकारी व कर्मचारी काय करीत होते की, त्यांच्याच आशिर्वादाने हा गोरख व्यवसाय सुरु होता अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.वाडा शहरात लाकडाचे एकुण ९ दास्तान डेपो असून या दास्तान डेपोवर देखरेख करणारे वाडा बीटचे वनपाल विष्णू मुळमुळे यांच्यावर या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल एच.व्ही. सापळे यांनी दिली आहे.
चाळीस लाखांचा विनापरवाना लाकूडसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 1:13 AM