वसई : मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटींग सुरु असतानाच वसई-विरारला ही मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. वसई पूर्वेकडील मिठागरात मुसळधार पावसामुळे पाणी शिरलं आहे. या मिठागरात ४०० जण अडकल्याची माहिती आता समोर आली आहे. या परिसरात मिठागरात काम करणाऱ्या कामगारांची वस्ती आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने या वस्तीत पाणी शिरलं आहे.
पालघर आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी विवेकानंद कदम आणि वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पालिका मदत पथक आणि महसूल विभागाचे कर्मचारी नवघर मिठाघर येथे पोहचले असून तेथील काम करणाऱ्या 200 ते 250 कामगारांना होड्यांद्वारे काढण्यात येत आहेत. या मिठाघर परिसरात नेहमीच पाणी साचते आणि तेथील कामगारांना प्रशासन काळजी घेण्याच्या सूचना देत असते. केवळ वसईचा हा ग्रामीण भागच नाही तर शहरी भागातही पाणी साचले आहे. त्यामुळे होड्या चालवून प्रशासन मदत कार्य करत असून अडकलेल्या कामगारांना काढण्यात येत आहे.
वसई, विरार, नालासोपाऱ्यात अधून मधून मुसळधार पावसासह संततधार सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. पावसामुळे जनजीवनदेखील विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे वसई-विरार येथील कॉलेज-शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. डहाणूहून विरारकडे जाणारी उपनगरीय रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. वाणगाव, बोईसर, पालघर, केळवे रोड आदी स्थानकांवर ट्रेनही थांबवण्यात आल्या आहेत.