सुरेश लोखंडे, ठाणेआतापर्यंत अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होणे अपेक्षित होते. परंतु, पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यात सुमारे ६५ टक्के म्हणजे ४२ हजार २५० हेक्टरवर भातलागवड करण्यात आली असून उर्वरित सुमारे ३५ टक्के क्षेत्रावरची लागवड या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी लोकमतला सांगितले. संततधार पाऊस सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात केवळ ३ टक्के म्हणजे एक हजार ८०० हेक्टरवर लागवड झाली होती. पण, आठवडाभरात पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीस प्रारंभ केला आहे. यामुळे आतापर्यंत ६५ टक्के शेतांवर भातलागवड पूर्ण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. उर्वरित ३५ टक्के म्हणजे २२ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावरील लागवड विलंबाने होणार असली तरी उत्पादनात फारशी घट होणार नसल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील प्र्रतिहेक्टरी २४०० ते २५०० क्विंटल भात उत्पादन घेणे शक्य होणार आहे. यासाठी लागणाऱ्या सुमारे ६४३० मेट्रीक टन खताचा पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे. यामध्ये पाच हजार ५४७ मेट्रीक टन युरियासह १४ हजार किलो फोरेट खताचादेखील समावेश आहे. या भातलागवडीसाठी पाच हजार ७०० हेक्टरवरील नर्सरीत भाताची रोपे तयार करण्यात आलेली आहेत.
४२२५० हेक्टरवर भातलागवड !
By admin | Published: August 03, 2015 3:41 AM