मीरारोड- मीरारोड येथील एका विकासकाच्या कामगारांसाठीच्या झोपड्याना आग लागून ५ गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला. सुदैवाने यात कोणतीही जीवित होणे झाली नाही. कनकिया भागातील के डी एम्पायर मागील सालासर ग्रुपचे इमारत बांधकाम सुरु आहे. त्याठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना राहण्यासाठी झोपड्या बनवल्या आहेत. सोमवारी दुपारी त्यातील एका झोपडीस आग लागून ती पसरू लागली. काही वेळातच एका मागोमाग एक असे ५ गॅस सिलेंडरचे स्फोट होऊन परिसर हादरून गेला. धुराचे लोट उसळले.
महापालिकेच्या अग्निशन दलास याची माहिती मिळताच स्वतः अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांच्यासह अन्य ३ अधिकारी व ३२ जवानांनी घटनास्थळी धाव घेत ५ अग्निशामक बंब, २ टँकर ने आग आटोक्यात आणली. गॅस सिलेंडरचे स्फोट होत असल्याने जवानांनी आतील काही सिलेंडर सुरक्षित रित्या बाहेर काढले. आगीत तीन झोपड्या जळून गेल्या आहेत.
परिसरात शाळा-महाविद्यालय आणि निवासी संकुले असल्याने काहीशी घबराट माजली. जवळच असलेल्या पोलीस उपायुक्त कार्यालयातून परिमंडळ १ चे उपायुक्त प्रकाश गायकवाड, मीरारोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आदी घटनास्थळी आले.