पालघर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यासह तुफानी लाटा उसळू लागल्याने जिल्ह्यातील 500 ते 600 मच्छिमार नौका आणि त्या मधील सुमारे 1 लाख मच्छीमारांचा जीव धोक्यात सापडला आहे. तुफानी लाटांचा मारा सहन करीत काही नौका किनाऱ्यावर हळू हळू येत असून शासनाने त्याच्या बचावासाठी यंत्रणा पाठविणे गरजेचे बनले आहे. या दरम्यान सकाळ पासून किनारपट्टीवर घोगावणाऱ्या वादळी वाऱ्याने मच्छीमारांच्या प्रत्येक घरातील धाकधूक मात्र आता वाढू लागली आहे.
ऑगस्ट महिन्यात उशिराने सुरू झालेल्या मुसळधार पाऊस आणि तुफानी वादळी वाऱ्याने समुद्रात 1 ऑगस्ट पासून समुद्रात मासेमारीला गेलेल्या लाखो मच्छिमार व त्यांच्या खलाशी कामगारांचा जीव धोक्यात पोहोचला आहे.परंपरागत मच्छीमारांची 15 मे ते 15 ऑगस्ट या मासेमारी बंदीच्या कालावधीचे आदेश काढण्याची अनेक वर्षांच्या मागणीकडे केंद्र व राज्य शासन दुर्लक्ष करीत आल्याने समुद्रात नाईलाजाने मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांचा जीव धोक्यात सापडला आहे. या धोकादायक अवस्थेत समुद्रात मासेमारी करायला भाग पडणाऱ्या शासन व त्याच्या यंत्रणे विरोधात मच्छीमारांमध्ये सध्या प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी, मुरबे, दांडी, नवापूर, डहाणू, वसई, अर्नाळा, नायगाव तर ठाणे जिल्ह्यातील उत्तन आदी भागातील सुमारे 600 नौका समुद्रात गेल्या असून मुसळधार पाऊस आणि महाकाय लाटा उसळत असल्याने आम्ही किनारी परत आल्याचे हरेश मेहेर या मच्छिमाराने 'लोकमत'ला सांगितले. 6 ऑगस्टपर्यंत गोवा, मुंबई ते गुजरातपर्यंतच्या भागात समुद्रात वादळी वातावरण राहणार असल्याने मच्छीमारांची कुटुंबीय चिंताग्रस्त झाली आहेत. कारण, मुंबई-गुजरात दरम्यानच्या 40 ते 55 नॉटिकल समुद्री क्षेत्रात सध्या या सर्व नौका मासेमारी साठी उभ्या असल्याने पावसाचा जोर वाढत असून वाऱ्याचा वेग वाढल्याने नौका मधील सुमारे 1 लाख मच्छिमार व खलाशी कामगारांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.
आणखी बातम्या...
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर, सखल भागात पाणी साचले, रेल्वेही ठप्प!
मुंबईत पावसाचे धूमशान, पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतूक कोलमडली
जोरदार पावसाने डोंबिवली शहराला झोडपले, चाकरमान्यांचे नियोजन कोलमडले
सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा