पालघर : डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एकूण 33 आश्रमशाळांमध्ये बोईसर कांबळ गाव येथील मध्यवर्ती किचनमधून अन्नपुरवठा केला जातो. या किचनमधून पुरवण्यात आलेले अन्न खाल्ल्याने एकूण 39 आश्रमशाळांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी घडली, या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. यापैकी ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, काही विद्यार्थी अत्यवस्थ आहेत. या विद्यार्थ्यांना आदल्या दिवशीची भाजी पुन्हा दुसऱ्या दिवशी जेवणात दिल्याने हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
चवळीची भाजी खाल्ल्यानंतर जुलाब• डहाणू, पालघर, तलासरी आणि वसई या तालुक्यांत ३३ आश्रमशाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये कांबळ गाव येथील सेंट्रल किचनमधून दररोज सकाळचा नाश्ता, दोनवेळचे जेवण पुरवले जाते.• या सर्व विद्यार्थ्यांना सोमवारी सकाळी चवळीची भाजी आणि एक अंडे, तर संध्याकाळी दुधी आणि डाळीची भाजी जेवणात दिली.• त्यानंतर मंगळवारी सकाळी जेवण देताना पुन्हा चवळीची भाजी आणि एक अंडे दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. काही वेळेतच त्यांना उलट्या, जुलाब होण्यास सुरुवात झाली.• त्यामुळे सोमवारची चवळीची भाजी पुन्हा मंगळवारी विद्यार्थ्यांना दिली तर नाही ना? की ज्यामुळे मुलांना उलट्या झाल्या, असा प्रश्न आदिवासी संघटनेचे डॉ. सुनील पहाड यांनी उपस्थित केला आहे.
या आश्रमशाळांतील विद्यार्थी रुग्णालयांत रनकोळ आश्रमशाळेतील ९४, मसाड आश्रमशाळेतील ३, तवा येथील ६, महालक्ष्मी येथील २, खंबाळे येथील ३०, आंबेसरी येथील ४७, अस्वली येथील ३. कासपाडा येथील ४२. कळमदेवी येथील ३०, भाताने येथील ८, खुटल येथील १७, नानिवली येथील ६, बेटेगाव येथील ६, कांबळगावातील ५, नंडॉरेतील ६०, गोवाडेतील २८, सावरेतील १२, टेकाळेतील २०, टाकव्हालेतील ४ आणि लालठाणेतील ८ विद्यार्थी अशा सुमारे ५०० विद्यार्थ्यांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील ३३२ विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्यात आल्यानंतर त्यांच्यावरील धोका आता टळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले,
जिल्हाधिकारी बोडके, विवेक पंडित यांनी केली सेंट्रल किचनची पाहणी ज्या सेंट्रल किचनमधून तयार जेवण पुरवण्यात येते. त्या किचनला पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि राज्यस्तरीय आदिवासी विकास विभागाच्या आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी भेट देऊन पाहणी केली. आश्रमशाळांमधील १५ हजार विद्यार्थ्यांना नाश्ता आणि दोन वेळचे तयार जेवण २१ बंदिस्त वाहनांमधून आश्रमशाळांमध्ये पोहोचवले जाते. वर्षभरापूर्वी टाटा ट्रस्टमार्फत 'ना नफा, ना तोटा तत्त्वावर सेंट्रल किचन चालवण्यात येत होते. यंदाच्या वर्षापासून आदिवासी प्रकल्प विभागार्फत सेंट्रल किचन चालवले जाते. किचनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि रक्ताचे नमुने घेण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरु आहे. दरम्यान, आमदार विनोद निकोले यांनी तलासरीत विर्थ्यांची विचारपूस केली. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडे, डॉ. तन्वीर शेख यांनी सेंट्रल किचनची पाहणी केली.
सुमारे ५०० विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यातील ३३२ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. अन्नाचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.- गोविंद बोडके, जिल्हाधिकारी, पालघर
सेंट्रल किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव, जेवणाबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे त्याचे ऑडिट करून हा ठेका रद्द करण्याबाबत आदिवासी विकासमंत्रीविजयकुमार गावित यांच्याकडे तक्रार केली आहे.- राजेंद्र गावित, माजी खासदार