पालघर : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात होणाऱ्या मच्छीमारीत यंदाही सतत दुस-या वर्षी ५४ टक्के वाढ झाली आहे. तर देशातील मत्स्योत्पादनात ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मच्छीचा दुष्काळ पडणार अशी होणारी हाकाटी निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.२०१७ मध्ये असलेले मच्छीचे २.९२ लाख टन असलेले उत्पादन २०१८ मध्ये ३.८० लाख टन एवढे झाले आहे.२०१६ मध्ये ही वाढ फक्त १० टक्के होती. ही आकडेवारी सीएमएफआय या संस्थेने प्रसिद्ध केली आहे.२०१० पर्यंत मच्छीमारीच्या प्रमाणात प्रचंड घट झाली होती. मच्छीमारीचा खर्चही करणे परवडू नये एवढे कमी उत्पादन होत होते. त्यानंतर ही स्थिती बदलण्यासाठी माशांच्या विणीच्या काळात म्हणजे १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या काळात सागरी मच्छीमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच २०१४ पासून पर्ससीन नेटने होणारी मच्छीमारी सगळ्याच मच्छीमारांच्या हितावर उठल्याने तिच्यावर बंदी घालण्यात आली. तसेच लीडचे दिवे लावून मच्छीमारी करण्यावरही बंदी घालण्यात आली. त्याचप्रमाणे मच्छीमारीसाठी वापरल्या जाणाºया जहाजांचा आणि जाळ्यांचा आकारही मर्यादीत ठेवण्यात आला. केरळ आणि तामिळनाडूसारख्या राज्यांनी तर पकडावयाच्या माशांचा आकारही ठरवून दिला. त्यापेक्षा छोट्या आकाराची मच्छी जाळ्यात आल्यास ती तत्काळ समुद्रात परत सोडून देणे बंधनकारक करण्यात आले. या उपायांमुळे मच्छीच्या पुनरूत्पादनात व मच्छीमारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असे या संस्थेचे शास्त्रज्ञ नाखवा यांनी म्हटले आहे.पूर्णपणे वाढ न झालेल्या मच्छीची मार होऊ नये यासाठी केरळ आणि तामिळनाडू या राज्यातील मच्छीमार खात्याने अचानक सागरी धाडी घालण्याचे तंत्र अनुसरले आहे. अशा धाडीत जर त्या जहाजावरील पकडलेल्या मच्छीत निर्धारीत आकारपेक्षा छोटे मासे आढळले तर त्यांना दंड करणे, मच्छीमारीचा परवाना स्थगित करणे अशी शिक्षा केली जाते.त्यामुळे ही मच्छीचे प्रमाण वाढले आहे.याशिवाय समुद्रामध्ये जे पर्यावरणीय व भौगोलिक बदल होतात त्याचाही परिणाम या मच्छीच्या उत्पादन वाढीमागे आहे. जर या तीनही बंदी अत्यंत कटाक्षाने पाळल्या गेल्या तर मच्छीच्या उत्पादनात अधिक मोठी वाढ घडून येऊ शकते असे या संस्थेने म्हटले आहे.सर्व प्रकारची मच्छी वाढत असतांना पॉम्फर्टचे उत्पादन मात्र ४८ टक्क्यांनी घटले आहे. परंतु सुरमई आणि बांगडा यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रॉन्सचे उत्पादन २४.४० टक्क्याने वाढले आहे. तर राणी मच्छीचे उत्पादन ८९ टक्क्याने, कॅटलफिशचे उत्पादन १५० टक्क्यांनी तर बांगड्याचे उत्पादन ९५ टक्क्यांनी वाढले आहे.आणखीनही काही उपायांचा अवलंब केल्यास हे उत्पादन अजूनही वाढू शकते.वाढ न झालेल्या मच्छीमारीत दुहेरी तोटाअनिर्बंधरित्या केलेली मच्छीमारी ही सर्वांसाठीच तोट्याची ठरते. कारण पूर्ण वाढ न झालेल्या मच्छीला भाव मिळत नाही. आणि तेवढ्या प्रमाणात पूर्ण वाढ होऊ शकणारी मच्छी घटते. त्यामुळे मच्छीचा तात्पुरता दुष्काळ पडल्यासारखी स्थिती निर्माण होते. हे लक्षात घेऊन मच्छीमारांनी केवळ जास्त मच्छीमारीचा लोभ करू नये .पूर्ण वाढ होण्याआधीच मच्छी पकडल्याने भविष्यात तिचे प्रमाण कमी होऊन मच्छीमारीवरील खर्चही वसूल न होण्यासारखी परिस्थिती उद्भवते. म्हणजेच पकडलेल्या अपूर्ण वाढ झालेल्या मच्छीला भाव नाही व तेवढ्या प्रमाणात भविष्यातील मच्छी घटल्याने त्या काळातील मच्छीमारीचा खर्च परवडत नाही असे दुहेरी नुकसान होते.
महाराष्ट्रातील सागरी मच्छीमारीत ५४% वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 3:00 AM