विरार : वसई तालुक्यातून अल्पवयीन विद्यार्थी आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. गेल्या वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या नाहीत. यातील अद्याप अनेक मुलांचा शोध लागलेला नाही. मध्यमवर्गीय लोकवस्तीतून गृहोपयोगी साहित्य आणण्यासाठी बाजारात,नाक्यावरील दुकानात गेलेली हि मुले बेपत्ता झाली आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०१५ मध्ये वसई-0९,विरार-७७, माणिकपूर-२५,नालासोपारा-३४,वालीव-७३, तुळींज-११०, अर्नाळा-0१ आणि जानेवारी ते आॅगस्ट २०१६ या कालवधीत वसई-0५, विरार-५२,माणिकपूर-0९, नालासोपारा-१३, वालीव-४९ , तुळींज-८७, अर्नाळा-0९ असे वीस महिन्यात ५६० मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. तुळींज,वालीव आणि विरार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या वीस महिन्यात विरार-१२९, वालीव-१२२, तुळींज-१९७ असे ४४८ मुले बेपत्ता झाली आहेत. तर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १० मुले हरवली आहेत. यातील मोजकीच मुले स्वत:हून परतली आहेत. तर मोजक्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. परत आलेल्या मुलांची नोंद केली जात नसल्याने नेमकी किती मुले परतली याची माहिती पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध नाही. तसेच १४ ते सतरा वयोगटातील मुला-मुलींचे प्रेमप्रकरणातून घर सोडून जाण्याचे प्रमाणही अधिक असल्यामुळे बेपत्ता मुलांची कागदोपत्री आकडेवारी वाढत चालली आहे. गायब होणाऱ्या मुलांचे वयोगट पाच ते सतरा असल्याचेही दिसून येत आहे. याप्रकरणी परप्रातिंय टोळ्या कार्यरत असल्याच्या वावड्या उडत असल्या तरी पोलिसांकडून या वृत्तास दुजोरा मिळाला नाही. (प्रतिनिधी)
वसईतून वीस महिन्यात झालीत ५६० मुले बेपत्ता
By admin | Published: September 28, 2016 2:55 AM