नालासोपारा (मंगेश कराळे) - पतीच्या हत्येची पत्नीने दिलेली सुपारी, बोलण्यात गुंतवणूक हातचलाखीने एटीएम बदलून फसवणूक करणारी चौघांची टोळी, गटारावरील लोखंडी झाकणाची चोरी करणारी टोळी, घरफोडी करणारा आरोपी अशा अनेक गुन्ह्यातील आरोपींचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आज सन्मान करण्यात आला. गुन्ह्यांची उकल करणार्या ६ पोलीस अधिकार्यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते जानेवारी महिन्यातील ‘उत्कृष्ट उकल’ अर्थात बेस्ट डिटेक्शनचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सायबर विभाग, गुन्हे शाखा १, २ आणि ३, पेल्हार आणि वालीव ठाण्याच्या पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे.
दर महिन्याला उत्कृष तपास करून गुन्ह्यांची उकल करणार्या पोलीस अधिकार्यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते उत्कृष्ट उकल (बेस्ट डिटेक्शन) चा पुरस्कार देण्यात येतो. जानेवारी महिन्यात मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ६ पोलीस अधिकार्यांना हा सर्वोत्कृष्ट उकलचा पुरस्कार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते देण्यात आला.
पत्नीने दिली होती पतीच्या हत्येची सुपारी
गोरेगाव परिसरात राहणाऱ्या कमरुददीन अन्सारी (३५) हा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नी आशिया अन्सारी हिने चक्क एक लाख रुपयांना हत्येची सुपारी दिल्याचे गुन्हा उघडकीस आल्यावर धक्कादायक वास्तव्य लोकांसमोर आले. तीन महिन्यांपूर्वीच परिसरात राहायला आलेल्या आरोपी बिलाल उर्फ मुल्ला पठाण (४०) याला २१ जानेवारीला सुपारी देऊन २० हजार रुपये दिले होते. उर्वरित ८० हजार रुपये २ फेब्रुवारीला देण्याचे ठरले आणि हेच पैसे घेण्यासाठी गावावरून (हरिद्वार) येणारा आरोपी बिलाल व त्याची पत्नी सौफिया पठाण (२८) हिला ३१ जानेवारीला वापी रेल्वे स्थानकात हरिद्वार बांद्रा टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अत्यंत शिताफीने पकडले. याप्रकरणी गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूजी रणावरे यांना उत्कृष्ट उकल म्हणून गौरविण्यात आले.
आंतरराज्य टोळी जेरबंद
लोकांना बोलण्यात गुंतवून एटीएमची अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या आंतरराज्य टोळीला पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पकडले होते. आरोपी हे स्विप्ट कारने मध्यप्रदेशमार्गे महाराष्ट्रात येत असल्याबाबत माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील व यांच्या टीमने आरोपी विकी पंडीत साळवे (३२), विकी राजु वानखेडे (२२), अनिल कडोबा वेलदोडे (२९) आणि वैभव आत्माराम महाडीक (३४) या चौघांना धुळ्यात पकडले. आरोपींकडून वेगवेगळया बँकाचे एकुण ९४ एटीएम कार्ड, एक स्विप्ट कार, रोख रक्कम ८९ हजार व वेगवेगळया कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण ५ लाख २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला होता. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांना प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला
दिवसा घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद
दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपी अक्रम फारुक अन्सारी (२४) याला २३ जानेवारीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले होते. आरोपीकडून १४ गुन्ह्यांची उकल करून गुन्हयात वापरण्यात आलेले वाहन, सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल असा २ लाख ८९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शाखा ३ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला आहे.