मीरारोड : मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ७ अधिकारी व त्यांच्या पथकाचा पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी मार्च महिन्यातील गुन्ह्याची उत्कृष्ट उकल केल्या बद्दल मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयात पुरस्कार देऊन कौतुक केले. मीरारोड मध्ये बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री आले असता त्यांच्या कार्यक्रमात महिलांच्या गळ्यातील गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळ्या चोरून चोरटयांनी धुमाकूळ घातला होता. मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ चे निरीक्षक अविराज कुराडे व मीरारोडचे निरीक्षक विजयसिंह बागल यांच्या पथकाने ८ जणांना अटक करून ४१९ ग्राम चे सोन्याचे दागिने हस्तगत केले बद्दल गुन्ह्याची उत्कृष्ट उकलचे पहिले पारितोषिक कुराडे व बागल यांना देण्यात आले.
अल्पवयीन दिव्यांग मुलीवर सतत बलात्कार करून तिला गरोदर ठेवल्या प्रकरणी तपास करून पीडित व घरातल्याना माहिती नसताना आरोपीला अटक केली म्हणून विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस दिले. मीरारोड मधील घरफोडी प्रकरणी १४ हुन अनेक गुन्हे दाखल असलेल्या सराईत घरफोड्यास पळून जाण्या आधी २३ लाखांच्या मुद्देमालासह पकडल्याने काशीमीराचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. म्यानमार मध्ये अडकलेल्या भाईंदरच्या तरुणाची सुटका करून मायदेशी आणल्याबद्दल भाईंदर भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे व पथकास स्पेशल रिवॉर्ड देऊन आयुक्तांनी सन्मानित केले.
एका लहानश्या माहिती वरून एका नायजेरियन नागरिकास अटक करून ५८ लाख ७५ हजार किमतीचे कोकेन , एमडी आदी अमली पदार्थ हस्तगत केले म्हणून तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर याना स्पेशल रिवॉर्ड १ देण्यात आला. १६ वर्षां पूर्वी मीरारोड मधील एकाची हत्या करून त्याचा मृतदेह वसई हद्दीत महामार्गावर टाकणाऱ्या दोन आरोपीना उत्तराखंड मधून गुन्हे शाखा विरार कक्ष ३ चे प्रमोद बडाख आणि पथकाने अटक केली. त्या बद्दल स्पेशल रिवॉर्ड २ ने सन्मानित केले गेले. वसई गुन्हे शाखा कक्ष २ चे निरीक्षक शाहूराज रनावरे व पथकाने १३ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणू चौघा आरोपीना अटक केल्या बद्दल स्पेशल रिवॉर्ड ३ चे पारितोषिक देण्यात आले.