वसई : लुगडं आणि पोलक्याची पारंपरिक वेशभूषा आणि त्यावर टी-शर्ट धारण करून अनवाणी धावणारी आजी, हे चित्रं तसं आॅडच. पण, वसई-विरार महापौर मॅरेथॉनमध्ये हे चित्रं प्रत्यक्षात उतरलं. या वेषात धावणाऱ्या एका आजीने चक्क दुसरा क्रमांक पटकावला. ना ब्रँडेड कपडे, ना ब्रँडेड शूज अशा कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता त्यांनी ‘रन वसई रन’ची धाव पूर्ण केली आणि त्या जिंकल्याही. विमल बाबू पाडावळे (७१) असे या महिलेचे नाव आहे.
जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर माणूस कुठलेही ध्येय गाठतो आणि विजयी होतोच. रविवार, ८ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या महापौर मॅरेथॉनमध्ये याची प्रचीती आली. ग्रामीण भागातून ज्येष्ठांच्या गटात सहभागी झालेल्या एका महिलेने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ही महिला वसई तालुक्यातील वज्रेश्वरी रोडवरील सायवन गावातील छोट्याशा पाड्यात राहते. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच महिलेने मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.
महापौर मॅरेथॉन तसेच कला-क्रीडा महोत्सवातून अशा प्रकारचे कौशल्य सर्वत्र दिसून येते. त्यांना शोधून आर्थिक मदतीचा हात देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे, असेही मत माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी व्यक्त केले. सायवन येथील या ७१ वर्षीय महिलेची अपार जिद्द पाहून बविआ अध्यक्ष तथा आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षीतिज ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, महापालिका आयुक्त बळीराम पवार, महापौर प्रवीण शेट्टी यांनी त्यांचे खास कौतुकही केले. इतकेच नव्हे, तर विरारचे माजी नगरसेवक विलास चोरघे यांनी त्यांचे कौतुक करताना चक्क ‘सायवन एक्सप्रेस’ ही पदवी बहाल केली.