वाडा : वाडा नगरपंचायतीच्या सार्वित्रक निवडणुकीत बुधवारी झालेल्या मतदानात सकाळी काही अंशी निरूत्साह असला तरी कालावधी संपला तेंव्हा एकूण ७२.७९ % मतदान झाले दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने मतदानाचा टक्का वाढला.नगराध्यक्षपदासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची कन्या निशा सवरा तर शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर यांच्यात कडवी लढत असून भाजप शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत. तर १७ नगरसेवक पदांकरिता एकूण ७९ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. सकाळी सुरू झालेल्या मतदानात दुपार पर्यंत निरूत्साह दिसत होता. त्यामुळे १२ वाजेपर्यंत अवघे २६ टक्के मतदान झाले होते. परंतु शहरात व्यापारी व नोकरवर्गाची संख्या मोठी असल्याने या मतदारांनी दुपार नंतर मतदान करण्याला पसंती दिली. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदान वाढावे म्हणून मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रयत्न केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. आज झालेल्या निवडणूकीत भाजप शिवसेना व काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून कॉग्रेसच्या उमेदवार सायली पाटील या किती मतदान घेतात यावर भाजपचे विजयाचे समीकरण अवलंबून आहे. वाडा शहरात संघटनात्मक पातळीवर शिवसेना मजबूत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर आणि भाजपाच्या निशा सवरा यांच्यात ख-या लढतीची शक्यता आहे. भाजपाने मंत्री विष्णू सवरा यांची कन्या निशा हिच्या विजयासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. भाजपाला सत्ता विरोधी जनमताचा सामना करावा लागत असला तरी सवरांनी विजयासाठी शथीॅचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे प्रारंभी सोपी वाटणारी निवडणूक शिवसेनेसाठी आव्हान बनली आहे. विशेष म्हणजे नगराध्यपदाच्या सर्वच उमेदवार या प्रथमच ही निवडणूक लढवत आहेत. त्यांची राजकीय पाटी कोरी असल्याने मतदार कुणाला विजय करतील, हे सांगता येणे कठीण आहे.शिवसेनेचा भर व्यक्तिगत प्रचारावर तर भाजपचे हायटेक कॅम्पेनया निवडणुकीत शिवसेनेने प्रत्येक प्रभाग पिंजून काढत आपले मतदान राखण्यावर अधिक भर दिला. प्रचारात भपकेबाजी न करता एकमेव मंत्री एकनाथ शिंदे यांची सभा घेऊन मतदारांना आवाहन केले. तर भाजपाने तंत्रज्ञानाचाा वापर करून हायटेक प्रचार करत मतदारांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला.तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठी रॅली काढून मतदार आपल्याकडे झुकविण्याचा प्रयत्न केला असला तरी मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला हे येत्या १८ तारखेला स्पष्ट होईल. दरम्यान आज मतदानाच्या संपूर्ण दिवसात कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी दिली.
वाड्यात ७२.७९% मतदान, नगराध्यक्षपदासाठी पाच महिलांत लढत, ७९ उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:46 AM