वसंत भोईर, वाडापिंपरोली या गावात बिबट्याने धुमाकूळ घातला असून नऊ बकऱ्यांचा आतापर्यंत फडशा पाडला आहे. त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याऐवजी वनखात्याने ग्रामस्थांना रात्री फटाके वाजविण्याचा सल्ला दिला आहे. बिबट्यांची एक मादी आपल्या दोन बछड्यांसह संचार करीत असून रविवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी नऊ लहान बकऱ्यांचा त्यांनी फडशा पाडला असून २ बकऱ्यांना घेऊन बिबट्या जंगलात पसार झाला आहे. यातील ८ बकऱ्या या पांडुरंग गवारी यांच्या तर एक बकरी विठ्ठल कुऱ्हाडे यांच्या मालकीची होती. या घटनेची पशुवैद्यकीय अधिकारी सोनाळे व वनविभाग वैतरणा यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. तसेच हा भाग तानसा अभयारण्यात येत असून या भागात गेल्या अनेक दिवसापासून दोन पिल्लांसह बिबट्याचा मादीचा संचार सुरू असल्याच्या खूणा वनविभाग कर्मचाऱ्यांना दिसून आल्या आहेत. या आधीही तीन बकऱ्यांना अशाच प्रकारे फस्त केल्याचे ग्रामस्थ विठ्ठल कुऱ्हाडे यांनी सांगितले. अगदी लोकवस्तीत बिबटयाचा वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या मादिसह बछड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याच्या मादीसह बछड्यांचा संचार हा एकाच जागी नसल्याने तिचा बंदोबस्त कसा करायचा असा यक्षप्रश्न वनविभागा पुढे पडला आहे. नागरिकांनी सायंकाळी घराबाहेर पडू नये, रात्री एका माणसाने बाहेर पडू नये व रात्री गावात फटाके वाजवावीत असा सतर्कतेच्या सूचना वन विभागाने ग्रामस्थांना दिल्या असल्याची माहिती मोज वनविभागाचे वनपाल पी. आर. कांबळे यांनी दिली आहे.
बिबटयाने केल्या ९ शेळ्या फस्त
By admin | Published: December 23, 2015 12:28 AM