नालासोपारा (मंगेश कराळे) :- गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी वसईत ८ आरोपींकडून ९ अवैध अग्निशस्त्रे व २१ जिवंत काडतुसे सापडल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा वसईत सापडल्याने निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ माजली असून काही घातपात करण्याच्या तयारीत होते का याचा पोलीस शोध घेत तपास करत आहे.
वसई कोळीवाडा ते सुरुची बाग रस्त्यावरील अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी २३ सप्टेंबरला पावणे पाच वाजण्याच्या सुमारास १० हजार रुपयांचे देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसासह आरोपी पकडला आहे. मोईन उर्फ जिलेबी सैयद (३०) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार जगदीश गोवारी यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केले होते. आरोपी मोईन याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून तपास करत अवैध अग्निशस्त्रे खरेदी करणारे व पुरविणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन गुजरात व उत्तरप्रदेश या परराज्यातील आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न करून या गुन्ह्याच्या तपासात परराज्यात तपास पथके पाठवून ८ आरोपींना अटक केले आहे.
गुन्ह्यात मोईन उर्फ जिलेबी सैयद (३०), जावेद खान (३६), मोहम्मद आरिफ उर्फ शाहरुख खान (२९), अमित निशाद, अमितकुमार निशाद (२४), आलम उर्फ अलीम खान (२८) आणि देवा प्रजापती (२३) या आठ आरोपीकडून ३ लाख ८३ हजार ३०० रुपये किंमतीचे ९ देशी पिस्टल, २१ जिवंत काडतुसे व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, सुहास कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, अमोल कोरे, प्रशांतकुमार ठाकूर, अजित मैड, प्रतीक गोडगे, राजकुमार गायकवाड, मसुब रामेश्वर केकान, अविनाश चौधरी, शुभम गायकवाड तसेच सायबरचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी केली आहे.