- हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयामध्ये फ्लॅट, गाळे आदींची दस्त नोंदणीची सवलत ३१ मार्चपर्यंत देण्यात आली असली, तरी या कालावधीत दस्त नोंदणीचे शुल्क भरून पुढील चार महिने कधीही दस्त नोंदणी करता येणार असल्याची मुभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने या कार्यालयात फारशी गर्दी दिसून आली नाही. दरम्यान, जिल्ह्यात केवळ मार्च महिन्यामध्ये सुमारे ९० कोटी म्हणजेच ८९ कोटी ४७ लाख ८२ हजार ९२४ एवढी रक्कम दस्त नोंदणीतून जमा झाली आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यातील उपनिबंधक कार्यालयात आपल्या फ्लॅट, व्यावसायिक गाळे आदींची दस्त नोंदणी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनावाढीला आमंत्रण मिळत असल्याने ग्रामीण व शहरी भागासाठी विशेष बाब म्हणून जिल्हा निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना ही सवलत देण्यात आली आहे. राज्य शासनामार्फत डिसेंबरपर्यंत दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सवलत घोषित केली होती. या सवलतीचा फायदा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घेतलेला आहे. तसेच जानेवारी ते मार्चअखेर मुद्रांक शुल्क कमी केले असून ३१ मार्चपर्यंत शहरी भागांमध्ये चार टक्के मुद्रांक शुल्क व नोंदणी फी अशी पाच टक्के इतकी आहे. ही सवलत ३१ मार्चपर्यंत देण्यात आली असली, तरी ३१ मार्चपर्यंत आपल्या दस्त कागदपत्रांची नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये मोठी गर्दी होत असल्याचे लक्षात घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ तारखेपर्यंत ऑनलाइन अथवा इतर प्रकाराने दस्त नोंदणी शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत केव्हाही दस्त नोंदणी पक्षकारांना करता येणार असल्याची सवलत देण्यात आली असल्याचे नितीन पिंपळे यांनी कळविले होते. जिल्ह्यात पालघर, बोईसर, विक्रमगड, वसई भागांत एकूण १४ कार्यालये असून त्या अनुषंगाने बहुतांशी दस्त नोंदणीधारकांनी २७ मार्चआधीच आपल्या दस्त नोंदणीची कामे आटोपून घेतली होती. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवारी धुळवडीची सुट्टी असली, तरी मंगळवारी पालघरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात फारशी गर्दी दिसून आली नव्हती. दलालांचा सुळसुळाट?जिल्ह्यातील बहुतांश दुय्यम निबंधक कार्यालयांत दलालांचा सुळसुळाट झाला असून दस्त नोंदणी करतेवेळी या दलालांच्या हातात काही हजारांची रक्कम सोपविल्यानंतर तत्काळ नोंदणीचे काम होत आहे. मात्र, इतर काही दस्त नोंदणीधारकांना दोन-दोन दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी दुय्यम निबंधक कार्यालयांत नोंदणीसाठी आलेल्यांकडून होत आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
पालघर जिल्ह्यात 90 कोटींची दस्तनोंदणी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 2:45 AM