पारोळ : जागतिक पर्यावरण दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना विरार येथील अणासाहेब वर्तक हायस्कूलच्या सभागृहात पर्यावरण मित्र संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने ९० कवींना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यात आले. यावेळी त्यांनी निसर्ग संवर्धनासाठी विविध कविता सादर केल्या.
या कविता सादर करण्यासाठी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, या जिल्ह्यातील कवींनी उपस्थिती दाखवली होती. मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांतून हे सादरीकरण झाले. यावेळी कवींना भेटीच्या स्वरुपामध्ये रोपांचे वाटप करण्यात आले. संघटनेच्यावतीने देशात विविध ठिकाणी पर्यावरण रक्षणाची मोहिम राबविली जात आहे. कवी संम्मेलनाच्या माध्यमातुन पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन किती महत्वाचे आहे. याची जाण उपस्थितांना करून देण्यात आली. तर या वर्षी आम्ही वटपौर्णिमेला पूजा करताना तोडलेल्या फांद्याची पूजा करणार नाही असा संकल्प या प्रसंगी उपस्थित महिलांनी घेतला.
या महाकवी संमेलनात नवीन कवींना दाद देण्यासाठी वज्रेश सोळंकी, नेहा धारूळकर, विजय जोगमार्गे, सुजाता कवळी, सुरेखा कुरकुरे, योगेश गोतारणे, विजय चोघळा, नीलम पाटील साहित्य क्षेत्रातील जाणकारांबरोबरच सुरेश रेंजड, संतोष वेखंडे, सुगंधा जाधव, तुकाराम पष्टे, राजेश पाटील आदी सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीही उपस्थित होत्या.