शौकत शेख डहाणू : पालघर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील १८ गावे आणि खेड्यापाड्यांना बाडापोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेंतर्गत साखरे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, येथील ग्रामपंचायतींनी वेळाेवेळी नोटिसा देऊनही दरमहा पाण्याचे बिल भरलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत ९४ लाखांची थकबाकी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने संबंधित ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा कपात करण्याचे आदेश दिले असून भरउन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
डहाणूच्या बंदरपट्टी भागातील चिंचणी, तारापूर, वाणगाव, गोवणे, आसनगाव, कोलावली, बावडा, तनाशी, चंडीगाव, वाढवण, वरोर, वासगाव, बाडापोखरण, पोखरण, धाकटी डहाणू, तडियाले, धूमकेत, गुंगवाडा, कापसी इत्यादी गावांना तसेच खेड्यापाड्यांना साखरे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. अनेक वर्षांपासून बाडा-पोखरण प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचे देखभाल-दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे असल्याने संबंधित ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टीही पाणीपुरवठा विभाग वसूल करत असते. वारंवार सूचना, नोटीस बजावूनही ग्रामपंचायत दरमहा येणारे पाणीबिल भरण्यास चालढकल करत असल्याने या ग्रामपंचायतींवर मोठ्या प्रमाणात थकबाकी झाली आहे. यामध्ये डहाणूतील सर्वात मोठ्या चिंचणी ग्रामपंचायतीवर ४० लाख रुपये, तर तारापूर ग्रामपंचायतीवर २१ लाख रुपयांची थकबाकी आहे.
वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीमुळे गाव-शहरांत लाॅकडाऊन झाल्याने अनेकांचे नोकरी-व्यवसाय बंद झाल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली हाेती. त्यात बहुसंख्य मालमत्ताधारकांनी ग्रामपंचायतीला घरपट्टी, पाणीपट्टी भरली नसल्याने ग्रामपंचायतीच्या तिजोरीतही ठणठणाट आहे.
बाडापाेखरण याेजनेलाही नाेटीसदरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (वाणगाव) च्या अंतर्गत येत असलेल्या साखरे धरणातून बाडा-पोखरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला कच्चा पाणीपुरवठा केला जाताे. त्या पाण्याचे अनेक वर्षांचे दोन कोटींचे बिल बाडा-पोखरण योजनेने भरले नसल्याने प्राधिकरणाने पाणीकपातीची नोटीस दिली आहे.