मंगेश कराळेनालासोपारा : आयुक्तालयातील कार्यरत बहुतांश पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना कोरोना काळात लागण झाल्यानंतर त्यावर मात करून ते कर्तव्यावर पुन्हा हजर झाले आहेत. यामुळे पोलीस दलामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जगभरासह वसई तालुक्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून नागरिकांना केले जात आहे. वसई, विरार व पालघर जिल्ह्यामध्ये वीकेंड लॉकडाऊन केले असले तरी नागरिक बिनधास्त घराबाहेर पडत असल्याने कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. मृतांच्या आकड्यांतही लक्षणीय वाढ झाली आहे. आयुक्तालयातील पोलीस दलाला कोरोनाचा वाढत असलेला विळखा चिंतेचा विषय बनला होता; पण लागण झालेले बहुतांश पोलीस अधिकारी आणि अंमलदार कोरोनावर मात करून कर्तव्यावर रुजू झाले आहेत.
दुसऱ्या लाटेत वसई, विरार, नालासोपारा या शहरांतील कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. राज्य शासनाने कडक निर्बंध लावल्यावर याची अंमलबजावणी करण्यासाठी व मनाई आदेशाचा भंग होऊ नये, विनाकारण फिरणाऱ्या, मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईसाठी आणि गर्दी न करण्यासाठी आवाहन करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि अंमलदार रस्त्यावर उतरले आहेत.