(मंगेश कराळे)
नालासोपारा :- आचोळे रोडवरील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत साडे पाच वाजण्याच्या सुमारास एका विद्यार्थ्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा शाळेत फोन आल्याने शहरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एकच खळबळ माजली आहे. शाळेने आचोळे पोलिसांना माहिती दिल्यावर वरिष्ठ अधिकारी, आचोळे पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी हजर होऊन तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बॉम्ब स्कॉडला याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांची प्रतीक्षा पोलीस करत असल्याचे कळते. हा कॉल कुठून व कोणी केला तसेच ही अफवा आहे का याच दृष्टीने पोलीस शोध घेत तपास करत आहे.
आचोळे रोडवरील ब्लोमिंग बर्ड नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत सोमवारी संध्याकाळी शाळेत एक निनावी कॉल आला की, एका विद्यार्थ्याच्या बॅगेत बॉम्ब आहे. या कॉलनंतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी भयभीत झाले आहेत. शाळेने या कॉलबाबत आचोळे पोलिसांना माहिती दिली आहे. आचोळे पोलीस घटनास्थळी पोहचून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. शाळेच्या व आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.