मीरारोड: ३१ डिसेंबर २०२२ रोजी प्रेमविवाह झालेल्या विवाहितेने अवघ्या वर्षभरात म्हणजेच ३१ डिसेंबर २०२३ रोजी आत्महत्या करून आयुष्य संपवले. चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण व छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून मुलीच्या वडिलांच्या फिर्यादी वरून जावयावर १७ जानेवारी रोजी भायंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रेमविवाहाच्या ह्या दुर्दैवी अंतबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
नांदेडच्या शिवाजी नगर, जयभीम नगर मध्ये राहणाऱ्या सोनल गोडबोले हिचे त्याच भागात राहणाऱ्या विकास उर्फ विक्की शेळके याच्याशी ३१ डिसेंबर २०२२ रोजी प्रेमविवाह झाला होता. विकास याचे आधीच लग्न झालेले होते व पहिल्या पत्नी पासून त्याला तीन मुलं आहेत. परंतु घरच्यांच्या विरोधात जाऊन सोनल हिने प्रेमविवाह केला. परंतु विकास हा सोनलवर चारित्र्याच्या संशयावरून तिला मारहाण करणे, तिच्याशी नेहमी भांडण करणे, तिला मानसिक व शारीरिक त्रास देत असे. दोन महिन्यापूर्वी विकास व सोनल हे सोनलची भाईंदर मध्ये राहणारे बहीण शीतल ढगे कडे राहण्यास आले होते. १५ दिवसांनी विकास हा एकटाच नांदेडला निघून गेला. ३१ डिसेंबर २०२३ च्या पहाटे सोनल हिने बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
१ जानेवारी रोजी नांदेड येथे सोनलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शीतलच्या मुलीने, ३० डिसेंबरच्या रात्री उशिरा सोनलचे विकास सोबत मोबाईलवर जोराचे भांडण झाले होते असे सांगितले. त्यानंतर सोनलचे ६५ वर्षीय वडील धोंडीराम गोडबोले यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी सोनल हिला मारहाण, छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पती विकास शेळकेवर गुन्हा दाखल केला आहे.