मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या राहुल तिवारी स्पोर्ट्स ग्राउंड मधील सुमारे ६ लाखांच्या वीज चोरी प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अदानी इलेक्ट्रिसीटी कंपनीच्या दक्षता विभागातील वरिष्ठ व्यवस्थापक गणेश भोसले सह मनोज मांजरेकर व अन्य सहकारी कर्मचारी यांच्या सह भाईंदर पूर्वेच्या आरएनपी पार्क भागातील राहुल तिवारी स्पोर्ट्स ग्राउंड मध्ये वीज पुरवठ्याच्या तपासणी साठी २८ नोव्हेम्बर रोजी गेले होते. त्यावेळी तेथील थ्री फेज मीटर क्रमांक ९०२८०९५ हा राहुल तिवारी स्पोर्ट्स ग्राउंडचा असल्याचे समजले. फ्युज कट आउट मधून अनधिकृत रित्या वायर टाकून अनधिकृतपणे वीज चोरी केली जात असल्याचे आढळून आले.
सदर मैदानाचा व्यावसायिक कार्यक्रमांसाठी वापर होत असल्याने वीज चोरी प्रकरणी चौकशी केली असता मनोज यादव हा तेथे इव्हेन्ट मॅनेजर म्हणून काम करतो. तर चिंतामणी बाथम याने जागा मालक विपुल मिश्रा कडून मैदान भाड्याने घेतल्याची माहिती मिळाली. वीज मीटर मिश्रा याच्या नावाने आहे. तांत्रिक तपासणी केली असता २९ हजार युनिट वीज चोरी केली असून दंडा सह वीजचोरीची रक्कम ५ लाख २ हजार रुपये इतकी होत असल्याचे निष्पन्न झाले.
भोसले यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी १२ डिसेम्बर रोजी विपुलकुमार मिश्रा, चिंतामणी बाथम व मनोज यादव ह्या तिघांवर भारतीय विद्युत अधिनियम नुसार गुन्हा नोंदवला आहे.