नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारमध्ये मंगळवारी संध्याकाळी भिंत पडून तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी विरार पोलिसांनी बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरवर आणि आर्किटेक्टवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरला अटक केले आहे तर आर्किटेक्ट सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मंगळवारी संध्याकाळी विरारच्या मनवेलपाडा येथे पुनर्विकास सुरू असलेल्या सूर्यकिरण को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत लक्ष्मीबाई गव्हाणे (३८), राधाबाई नवघरे (४३), साहूबाई सुळे (२५) व नंदाबाई गव्हाणे (२५) या चार महिला भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या. या दुर्घटनेत लक्ष्मीबाई गव्हाणे (३८), राधाबाई नवघरे (४३), साहूबाई सुळे (२५) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर नंदाबाई गव्हाणे या गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
विरार पोलिसांनी रात्री उशिरा कॅश होम डेव्हलपर्सचे विकासक चिराग जनक दोषी, ठेकेदार भरत सुरेश पाटील व आर्किटेक उमेश केकरे या तीन जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विकासक चिराग जनक दोषी, ठेकेदार भरत सुरेश पाटील यांना अटक केली आहे.
१) दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरला अटक केले आहे तर आर्किटेक्ट सध्या फरार आहे. बुधवारी दोघांना वसई न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे)