मीरारोड- भाईंदरच्या उत्तन - पाली किनाऱ्या पासून सुमारे १० ते १२ किमी खोल समुद्रात लहान मच्छीमार बोट बुडाली. मात्र तेथील पर्ससीन बोटीने बुडणाऱ्या बोटीस वाचवले. त्यानंतर उत्तन भागातील मच्छीमार बोटींनी बुडालेल्या बोटीस दोरखंडाने ओढून किनाऱ्यास आणले.
उत्तन मोठागाव येथील ओझवेल जुरान श्रावण्या ह्या नाखवाची राणीमेल नावाची लहान मासेमारीची बोट आहे. ओझवेल व अन्य दोघेजण मासेमारीसाठी समुद्रात गेले होते . खोल समुद्रात मासेमारी करून त्यांच्या जाळ्याला मासळी चांगली लागली होती . मासळीचे वजन त्यात विरुद्ध दिशेने वारा वहात असल्याने बोटीत पाणी भरून बोट बुडू लागली . त्यावेळी पर्ससीन नेटच्या मोठ्या बोटीने बुडणाऱ्या बोटीला दोरखंडाने बांधून बोट व त्यावरील तिघांना वाचवले . जवळच मासेमारी करणारी उत्तनच्या अविनाश कलईकर यांची ईगल बोट मदतीसाठी धावली . त्या पाठोपाठ सायना , निलेश लंगडीबरी यांची पॅरिस , मॉरिस ज्यू यांची गॉडग्रेस ह्या बोटी मदतीसाठी धावून आल्या.
त्यांनी बुडालेली बोट दोरखंडाने बांधून सायंकाळच्या सुमारास उत्तन किनाऱ्यावर आणली . बुडालेल्या बोटीतले इंजिन पाणी जाऊन नादुरुस्त होण्याची भीती आहेच शिवाय पकडलेली मासळीचे वजन जास्त झाल्याने ती समुद्रातच फेकून द्यावी लागली. ओझवेल ह्या मच्छीमाराचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई शासनाने द्यावी . तसेच बंदी असून देखील पर्ससीन बोटी समुद्रात प्रचंड प्रमाणात बेकायदा मासेमारी करून मत्स्य साठा नष्ट करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मच्छिमार संघटनांनी केली आहे .