हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: वाढवण बंदर पूर्ण झाले तर जमिनीला पाचपट भाव मिळेल, असे आमिष दाखविणारी टोळी सक्रिय झाली आहे. वाडा येथील प्रज्वल पाटील याला वाणगाव येथील जमीन विक्री व्यवहार करणारे अमित भालचंद्र चुरी आणि त्याच्या अन्य सात साथीदारांनी बनावट दस्तऐवज बनवून एक जमीन विकली.
अशाच प्रकारे अनेकांना जमीन विक्री करून फसवणूक केल्याचा गुन्हा ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असतानाही आरोपी मोकाट आहेत. राजकीय वरदहस्तामुळे त्यांना अटक केली जात नसल्याची तक्रार फिर्यादीने ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
प्रज्वल पाटील यांच्या मामाच्या ओळखीच्या मासवन येथील डॉ. सुहास पंढरीनाथ संखे यांनी एका केसच्या कामासाठी नीलेश सांबरेंकडून आपल्या इंद्रधनुष्य कंपनी खात्यात ५० लाख रुपये घेतले. यावेळी डॉ. सुहास संखे यांनी वाणगाव येथील जमीन विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित चुरी याची ओळख फिर्यादीशी करून दिली.
जमीन खरेदीतून चांगली गुंतवणूक करून स्थापित कंपनीत भागीदारी देण्याचे ठरले. यावेळी या व्यवहारात पूनम चुरी आणि मोहीन शेख यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सुहास संखे आणि अमित चुरी यांच्या कंपनी खात्यात आणि शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ९ कोटी २२ लाख ६१ हजार १ रुपयांची रक्कम फिर्यादी प्रज्वल आणि नीलेश सांबरे यांच्या खात्यातून वळती केली.