लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मैदाने व उद्यानांत महिलांसाठी हिरकणी कक्ष तसेच नागरिकांसाठी ग्रंथालय होणार आहे . हिरकणी कक्षा साठी २० कोटींचा खर्च असून कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत . या शिवाय सार्वजनिक ठिकाणी मोकळी जागा उपलब्ध असले त्याठिकाणी देखील हिरकणी कक्ष उभारण्याचे प्रस्तावित आहे.
नोकरी , शिक्षण आदी विविध कामा निमित्त मुली , तरुणी , विद्यार्थिनी , महिला ह्या घरा बाहेर पडत असतात . परंतु सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी चांगले स्वच्छ असे स्वच्छतागृह अभावानेच उपलब्ध होते . शिवाय लहान बाळ असलेल्या मातांना स्तनपान साठी योग्य अशी जागा उपलब्ध नसते . महिलांची होणारी कुचंबणा पाहता त्यांना आवश्यक दर्जेदार सुविधा मिळावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासना कडे हिरकणी कक्ष उभारण्याची संकल्पना मांडत निधीची मागणी केली होती . आ . सरनाईक यांच्या पाठपुराव्याने शासनाने २० कोटींचा निधी मंजूर केला असून पालिकेने सदर कामाचे कार्यादेश देखील ठेकेदारास देण्यात आले आहेत . जून महिन्यातच सदर कामांना सुरवात होणार असून येत्या ६ ते ८ महिन्यात हिरकणी कक्ष बांधून होतील अशी शक्यता आहे .
आ . सरनाईक यांच्या मतदारसंघात मीरा भाईंदर महापालिकेच्या येणाऱ्या मैदाने व उद्यानात हिरकणी कक्ष उभारले जाणार आहेत . या हिरकणी कक्षात वातानुकूलित स्वछतागृह, स्तनपान कक्ष, सॅनिटरी पॅड्स व सॅनिटायझर वितरक यंत्र, स्वयंचलित फ्लशिंग यंत्र इत्यादी सोयी-सुविधा असणार आहे. आकर्षक आणि आधुनिक पद्धतीने हिरकणी कक्ष बांधले जातील . यामुळे मुली , तरुणी, महिला व स्तनदा मातांना चांगली दिलासादायक सुविधा उपलब्ध होणार आहे . मैदाने - उद्याने याशिवाय शहरातील वर्दळीच्या ठिकाणीही हिरकणी कक्ष तयार करण्यासाठी जागा शोधाव्यात असे या . सरनाईक यांनी महापालिकेस सांगितले आहे .
ओपन लायब्ररीही होणार - शहरातील उद्याने व मैदानात ग्रंथालय उभारण्याचा कामांचे कार्यादेश पालिकेने दिले आहेत . उद्यान - मैदानात केवळ विरंगुळाच नव्हे तर पुस्तक वाचनाचा आनंद देखील साहित्य व वाचनप्रिय नागरिकांना मोफत घेता येणार आहे . हे ग्रंथालय देखील आकर्षक स्वरूपात असणार आहेत. आजच्या काळात पुस्तके वाचण्याचे प्रमाण मोबाईल आदी मुळे कमी होत आहे . वाचन संस्कृती वाढावी व चांगल्या दर्जेदार पुस्तकांचे वाचन धकाधकीच्या जीवनात निसर्गरम्य ठिकाणी करता यावे यासाठी मैदान - उद्यानात ग्रंथालय उभारणीचा निर्णय आ . सरनाईक यांनी मंजूर करून घेतला आहे . हि खुली ग्रंथालये ज्ञानात वाढ करण्यासह विद्यार्थी , वाचनप्रेमी , तरुण आदींच्या हिताची ठरेल अशी खात्री आ . सरनाईक यांनी व्यक्त केली आहे