- मंगेश कराळेनालासोपारा - अटकेपासून बचाव करून पळून जाण्यासाठी आरोपीने महिला पोलीस उपनिरीक्षकासह मसुब कर्मचाऱ्याच्या अंगावर चारचाकी गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नायगांवच्या डॉन बास्को शाळेजवळ ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. महिला अधिकाऱ्याने नायगांव पोलिसांनी दोन आरोपी विरोधात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूकीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी अजित दयाशंकर मिश्रा याच्यावर आचोळे पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रे प्रकरणी गुन्हा दाखल होता. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रेखा पाटील यांना आरोपीचा नायगाव येथील डॉन बास्को शाळेजवळील अजंठा बिल्डींगजवळ शोध घेण्यासाठी मसुब कर्मचाऱ्यासोबत शनिवारी सकाळी गेले होत्या. त्यावेळी आरोपी अजित याने स्वतःची अटक वाचविण्यासाठी पोलिसांना पाहून मॅडम आप तो मेरे ही पिछे पडे हो, आज तो आपका खेळ खतम कर देता हु असे जोरजोरात बोलून इनोव्हा कारचालक अजय अंकुश गायकरला लवकर गाडी पळव आणि जो कोणी समोर येईल त्यांच्यावर चढव असे बोलला. रेखा पाटील आणि मसुब कर्मचारी अमोल आव्हाड या दोघांच्या अंगावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चालकाला आरोपीने अगांवर चढवण्यास सांगून कार जोरात रेस करून गाडी अंगावर घातली. प्रसंगावधान दाखवून दोन्ही पोलीस बाजूला झाल्याने थोडक्यात बचावले आहे. पण मसुब कर्मचारी आव्हाड याला कारने ठोकर मारल्याने मुका मार लागल्याने जखमी झाले आहे. आरोपी कारसह पळून जात असताना कार गेटला अडकून बंद पडली. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर अजित मिश्राने पोलिसांशी झटापट करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे.
मसूब कर्मचाऱ्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजितवर आचोळे येथे २ आणि तुळींज येथे ३ असे फसवणूक, अपहार व बनावट कागदपत्रांचे ५ गुन्हे दाखल आहेत.