- मंगेश कराळे
नालासोपारा:- फसवणूक, खंडणी गुन्ह्यातील फरार आरोपी वकिलाला आचोळे पोलिसांनी शनिवारी सकाळी विरार फाटा येथून ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
सातपटी येथे राहणारे गोपालसिंग अमृतलाल चव्हाण (४८) यांचे गालानगर येथे चामुंडा गोल्ड पॅलेस नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. १७ ऑक्टोबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास वकील प्रसन्नजीत रावोत, रमेश मिश्रा, पंकज मिश्रा व श्रीनाथ टेस्टिंग सेंटरचे मालक अशा चार जणांनी खोट्या सोन्याच्या चेन देत त्या सोन्याच्या चेन खऱ्या असल्याचा रिपोर्ट देऊन त्यांच्याकडे १ लाख ९० हजाराची खंडणी मागितली होती. ती खंडणी न दिल्यास सोनार संघटनेत त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी २१ ऑक्टोबरला खंडणीसह फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आचोळे पोलीस गुन्ह्याचा तपास करत होते.
वकील प्रसन्नजीत रावोत याला वसई न्यायालयाने सात दिवसांचा जामीन दिला होता. पण सेशन कोर्टाने तो जामीन फेटाळून लावल्याने फरार झाला होता. आचोळे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरून शनिवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फटात येथे एका ट्रॅव्हलमधून ताब्यात घेऊन आचोळे पोलीस ठाण्यात आणले. त्याची तब्येत अचानक खराब झाल्याने पोलिसांनी त्याला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोपीला अटक करून वसई न्यायालयात हजर करणार असल्याचे आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी लोकमतला सांगितले.