लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- ५० हजार रुपये बक्षीस असलेला उत्तरप्रदेश राज्यातील २ वर्षापासून फरार असलेला मुख्य आरोपीला पकडण्यात नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटिकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी शुक्रवारी दिली आहे.
उत्तर प्रदेशच्या अयोध्यामधील कोतावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी उपेन्द्र सोनी, रोहीत पांडे आणि शेखर मिश्रा यांची गँग आहे. या गँगचा मुख्य रहीमुल्ल अन्सारी असून या चौघांनी मिळून चारचाकी गाडीच्या काचा फोडुन त्यामधून रोख रक्कम, लॅपटॉप, किंमती वस्तू चोरी करत असल्याबाबत कोतवाली पोलीस ठाणे येथे २ गुन्हे व कैट पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीविरुद्ध स्थानिक लोक घाबरत असल्याने त्यांच्याविरुध्द साक्ष देण्यास कोणीही येत नव्हते. या आरोपींविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे गँग ऍक्टप्रमाणे कारवाई करण्याची परवानगी घेवून कोतावली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी देवेन्द्र पांडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयातील आरोपी रहिमुल्ल हा गेले २ वर्षापासून फरार होता. तसेच त्यास पकडणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहिर करण्यात आले होते.
सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने एसटीएफ यांनी हा आरोपी नायगावच्या कामण चिंचोटी परिसरात राहण्यास आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या आरोपीचा शोध घेण्यासाठी नायगांव पोलिसांना मदत मागितली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशाने नायगांवचे गुन्हे प्रकटिकरण शाखा व एसटीएफ यांचे दोन वेगवेगळे पथके बनवून आरोपीचा कसून शोध घेणे सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी चिंचोटीच्या साडी कंपाऊंड परिसरातून ताब्यात घेतला. त्याला नाव व पत्ता विचारल्यावर त्याने रहीमुल्ल अन्सारी (३२) असे नाव सांगून वरील गुन्ह्यांची कबुली दिल्यावर त्याला अटक केले. आरोपीला चौकशी व तपासासाठी यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी रहीमुल्लवर तुळींज, नालासोपारा, अर्नाळा, माणिकपूर, वसई आणि विरार या पोलीस ठाण्यात सन २०१६ साली एकूण २७ गुन्हे दाखल आहेत.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुले - श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे, नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर टिळेकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) मंगेश अंधारे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि गणेश केकान, रोशन देवरे, पोलीस अंमलदार सचिन मोहिते, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, मसुब सिद्धेश्वर क्षीरसागर व यूपीचे एसटीएफचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे.