हितेन नाईक -
पालघर: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण केंद्रांवर होत असलेली गर्दी तसेच नागरिकांकडून लसीकरणाची होत असलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यात आणखी १७ केंद्रांची वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ६८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी जास्तीतजास्त केंद्रे वाढवून मिळावीत, अशी मागणी केल्यावरून १७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ४५ ते ५९ वर्षांदरम्यानच्या व्याधीग्रस्त १२ हजार ९६४ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे, तर तर ६० वर्षांवरील ४६ हजार ३४८ नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर दुसरा डोस १० हजार ७२० नागरिकांना देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ५७,०६८ लोकांनी घेतली लसजिल्ह्यात शासकीय रुग्णालयाद्वारे ४५ ते ६० वर्षांतील ३ हजार २३३ नागरिकांचा पहिला डोस तर ६० वर्षांवरील १२ हजार ९६४ नागरिकांचा पहिला डोस पूर्ण करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयात ४५ ते ६० वर्षांआतील १ हजार १४७ जणांचे लसीकरण तर ६० वर्षांवरील ३ हजार ९५९ लसीकरण पूर्ण झाले आहे. खाजगी रुग्णालयात ५ हजार २३८ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ४० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण ४६ हजार ३४८ नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर १० हजार ७२० नागरिकांना दुसरा डोस घेण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ६८ लोकांचे लसीकरण झालेले आहे.
सुरू झालेली नवीन लसीकरण केंद्रेपालघर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात, तलासरी तालुक्यात आमगाव येथे, वसई तालुक्यात कामण येथील प्रा. आ. केंद्रामध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तसेच वसई तालुक्यातील भाताणे प्रा. आ. केंद्र, डहाणू तालुक्यात घोलवड, गंजाड प्रा. आ. केंद्र व देहर्णे उपकेंद्र, पालघर तालुक्यातील सफाळा व सोमटा प्रा. आ. केंद्र, वसई तालुक्यातील निर्मळ व आगाशी येथील प्रा. आ. केंद्र, मोखाडा तालुक्यातील खोडाळा व मोखाडा येथील प्रा. आ. केंद्र व जव्हार तालुक्यातील ४ प्रा. आ. केंद्रांत पुढील आठवड्यापासून लसीकरणाची जोरदार मोहीम राबविण्यात येणार आहे.