तलासरी : मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 वरील तलासरी इभाडपाडा येथे मुंबईकडे जाणाऱ्या रसायनाने भरलेल्या टँकरला अपघात झाला. यावेळी झालेल्या स्फोटात टँकर भस्मसात झाला. रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत ड्रायव्हर आणि क्लीनरला बाहेर काढले. त्यांना नजीकच्या तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तलासरी येथे फायरब्रिगेडची सोय नसल्याने नजीकच्या उंबरगाव व डहाणू येथून मदत मागण्यात आली. मात्र त्यांनी येण्यास नकार दिल्याचे समजते.
अपघातानंतर दीड तासाच्या अवधी घटनास्थळी फायरब्रिगेड दाखल न झाल्याने, अनेक छोटे- मोठे स्फोट घडून टँकर जळून खाक झाला. दरम्यान, दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही दिशेने किमान 5 किमीपर्यंत रांगा लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.