मोदींवर अॅक्सिडेंट मेकर पी. एम. निघावा! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 02:31 AM2018-12-28T02:31:34+5:302018-12-28T02:31:53+5:30
मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत देशाने आर्थिक प्रगतीची सर्वोच्च शिखरे गाठली. त्यांच्यावर अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट निघाला आहे .
पालघर : मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत देशाने आर्थिक प्रगतीची सर्वोच्च शिखरे गाठली. त्यांच्यावर अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट निघाला आहे . आता पंतप्रधान मोदींनी मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा अॅक्सीडेन्ट केल्याने त्यांच्यावर अॅक्सीडेन्टमेकर प्राईम मिनिस्टर असा चित्रपट बनवला गेला पाहिजे अशी खोचक प्रतिक्रि या काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. यात मनमोहन सिंग यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत त्यांनी निषेध व्यक्त करून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.
ज्यांनी आपल्या बालपणातही कधी कागदाचे साधे विमानही उडविले नाही अशा उद्योगपती अंबानींच्या एका खाजगी कंपनीला राफेल विमान खरेदीचे कोट्यवधी रु पयांचे कॉन्ट्रॅक्ट देताना संरक्षण साहित्य खरेदीत मागील ६० वर्षांचा दांडगा अनुभव असलेल्या हिंदुस्थान ऐरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला मात्र डावलण्यात आल्याची माहिती सावंत ह्यांनी दिली.ह्या व्यवहारात ४१२०५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मागच्या ४ वर्षात भाजप सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार म्हणून समोर आणले जात आहे. मात्र त्यांच्या कारकिर्दीत देशातील राजकीय संवाद अतिशय खालच्या पातळीवर गेल्याचा आरोप त्यांनी केला.