डहाणू/बोर्डी : येथील अदाणी औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रातील राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरच्या अपघातांची मालिका ठराविक कालावधीने सुरू आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री डहाणू-बोर्डी या प्रमुख राज्यमार्गावर चिखले गावच्या वडकतीपाडा मैदानाजवळ राख भरलेला डंपर पलटी झाला.
या प्रकल्पातून निघणाºया राखेची डहाणू-बोर्डी प्रमुख राज्य मार्गावरून डंपरद्वारे गुजरात राज्यात वाहतूक केली जाते. सोमवारी मध्यरात्री ओव्हरलोडमुळे चालकाचा ताबा सुटल्याने डंपर पलटी होऊन राख मैदानात पसरली. त्यानंतर मंगळवारी दुपारी जेसीबी मशीनच्या साहाय्याने राख भरून त्याची वाहतूक करण्यात आली असून डंपर तेथेच आहे. तर घटनास्थळापासून मार्गालगत सुमारे दीड किमी अंतरावर चिखले पोलीस चौकी आणि तीन किमी अंतरावर घोलवड पोलीस ठाणे आहे. मात्र त्यांना या अपघाताची माहिती नसल्याने सायंकाळपर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नाही अशी माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. या प्रमुख राज्य महामार्गावरून अवजड वाहतुकीला बंदी असताना त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, राखेची ओव्हरलोड वाहने अपघातग्रस्त होण्याची ही पहिली घटना नसून याआही अनेक अपघात घडलेले आहेत. मात्र प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नसल्याची चर्चा होत आहे.
भरधाव वाहनामुळे अपघातसमोरून भरधाव वाहन आल्याने स्वत:चा डंपर वाचवताना तोल जाऊन हा अपघात घडल्याची माहिती अपघातग्रस्त डंपर चालकाने दिली आहे. या घटनेनंतर त्या ट्रान्स्पोर्टरवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान घटनास्थळी पडलेली राख उचलून त्याची वाहतूक करण्यात आली आहे, असे अदानी डहाणू थर्मल पॉवर स्टेशनमधून सांगण्यात आले.