वसई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने छोटे पक्ष तसेच अपक्षांच्या मताला मोठी किंमत आलेली आहे. तीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीला यात विशेष महत्त्व आले असून, महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजपकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वसई-विरारची कामे करणार, त्यालाच मते मिळणार, असे बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले असल्याने त्यांचे पत्ते गुलदस्त्यात आहेत. ‘लोकांची आमच्याकडून अपेक्षा असते. आम्ही काय कामे केली, हे ते पाहत असतात. राज्य सरकार असो की केंद्र सरकार; आम्हाला आमच्या कामात कोण सहकार्य करेल किंवा करणार आहे, हे पाहून आम्ही आमचे मत देऊ,` असे ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, आमदार ठाकूर आणि त्यांच्या पक्षाचे अन्य दोन उमेदवार शिवसेनेसोबत जाणार की भाजपसोबत? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.ठाकूर यांनी मात्र मला कोणत्याही पक्षाची ॲलर्जी नाही. जो पक्ष माझ्या जिल्ह्याचा, माझ्या लोकांचा विकास करेल, त्यालाच माझे मत असेल, असे सांगून या निवडणुकीतील उत्सुकता वाढविली आहे. १९९० पासून बहुजन विकास आघाडी हा पक्ष वाढविण्यात ज्यांनी योगदान दिले, ते ज्येष्ठ कार्यकर्ते आणि आम्ही तिन्ही आमदार एकत्रित बसून कुणाला सहकार्य करायचे, कुणाला मते द्यायची, यावर चर्चा करू! त्यामुळे कुणी माझी मते गृहित धरू नयेत. १० तारखेपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ, असे सांगून आमदार ठाकूर यांनी आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे.दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजप आणि मविआने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेनेने तर आपले आमदार फुटू नये यासाठी त्यांची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली आहे. १० जूनला ही निवडणूक होणार असल्याने अपक्ष आणि छोट्या राजकीय पक्षांवर मोठ्या पक्षांनी लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. त्यांची मते आपल्याकडे कशी वळवता येतील यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निवडणूक रंजक ठरणार आहे.
‘ईडी’चा दबाव नाही!‘ईडी’ची भीती दाखवून आमदार हितेंद्र ठाकूर यांना भाजप आपल्या बाजूने करेल, अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेलाही ठाकूर यांनी पूर्णविराम दिला आहे. ‘माझ्यावर ईडी वगैरे कुणाचा दबाव नाही. कुणावर तसा दबाव असेल तर मला माहीत नाही, पण माझ्यावर तरी अद्याप तसा दबाव नाही. भविष्यातही असे कुणी उपद्व्याप करणार नाही, याची मला खात्री आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा दबावांना घाबरणारे आम्ही नाही,’ असे त्यांनी सांगितले.