- मंगेश कराळे नालासोपारा - आरपीआय नेत्याची गोळी झाडून हत्या केलेल्या गुन्ह्यात तब्बल १६ वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी गुरुवारी दिली आहे.
१९ जानेवारी २०१९ रोजी आचोळे गावातील आरपीआय युवा कार्यालयात लालचंद जैस्वाल, युवा नेता प्रवीण धुळे व इतर कार्यालयात बसले होते. त्यावेळी चारचाकी गाडीमधून आलेल्या आरोपींनी प्रवीणला कार्यालयातून बाहेर बोलावून हाताने, दगडाने, विटाने मारहाण केली होती. प्रवीणला वाचविण्यासाठी गेलेल्यानांही मारहाण झाली होती. त्यानंतर आरोपी सिकंदर शेख, अनिल सिंग या दोघांनी त्यांच्या जवळील पिस्तूलमधून प्रवीणच्या पोटावर, गळ्यावर गोळ्या घालून हत्या केली होती. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी हत्या, आर्म्स ऍक्ट, अनुसूचित जाती जमाती अधिनियम कायदयानुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तात्काळ काही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. परंतू आरोपी जेपी उर्फ जयप्रकाश सिंग हा गुन्हा झाल्यापासून पोलिसांना मिळून येत नव्हता.
वरील अतिशय गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेपी उर्फ जयप्रकाशचा सर्वोतोपरी शोध घेऊन देखील तो गेल्या १६ वर्षापासून मिळून घेत नहता. त्याअनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी राहुल राख यांनी सपोनि दत्तात्रय सरक, पोहवा शिवाजी पाटील, गोविद केंद्रे, हनुमंत सुर्यवंशी असे तपास पथक तयार केले. या पथकाने गुन्ह्याची व आरोपीची माहिती मिळवली. या पथकाने आरोपीच्या मूळ गावी जावून सखोल तपास व माहिती काढल्यावर नालासोपाऱ्यात मूळ पत्ता बदलून राहत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने मागील ४ महिन्यापासून सतत अहोरात्र मेहनत घेत तपास सुरू ठेवला. आरोपी एका चॉकलेट कंपनीत मार्केटिंग काम करत असल्याची माहिती मिळाली. आरोपी हा ओस्तवाल नगरी येथे येणार असल्याची माहीती मिळाली व तेथे सापळा रचला. आरोपी तेथून निघुन गेल्याने त्याचा नालासोपारा ते भाईंदर रेल्वे प्रवासात पाठलाग करुन त्याला भाईंदर रेल्वे स्टेशनच्या कॅबिन रोड येथे २० ऑगस्टला दुपारी शिताफिने ताब्यात घेतले. त्याला तपासासाठी नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल राख, धनंजय पोरे, सपोनि दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, पोउपनिरी हितेंद्र विचारे, श्रीमंत जेथे, मनोहर तावरे, आसिफ मुल्ला, पोहवा शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, हनुमंत सूर्यवंशी, संग्राम गायकवाड, राजाराम काळे, संतोष मदने, राजविर संधू, प्रविणराज पधार, महेश वेल्हे, अनिल नागरे, अखिल सुतार, नितीन राठोड, साकेत माघाडे, अंगद मुळे, सफौ. संतोष चव्हाण यांनी केली आहे.