नालासोपारा (मंगेश कराळे) :- दुचाकी चोरून त्यावरून दोन चेन स्नॅचिंगच्या घटना करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून पोलिसांनी चार गुन्ह्यांची उकल करून दोन दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नायगावच्या डायस अँड पेरार नगर येथील बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रेनिता शिवडवकर (५६) यांच्या गळ्यातून १ मे रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास नायगाव पोलीस चौकीच्या जवळ आल्यावर दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांच्या मानेवर हात टाकून त्यांच्या गळ्यातील अंदाजे ७५ हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅम सोन्याची चेन खेचुन नेली होती.
माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देऊन युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीने चोरी करण्यासाठी वापरलेल्या दुचाकीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज परिक्षणाव्दारे चोरट्याचा पळून जाण्याचा मार्ग काढण्यात आला. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी वसई, विरार, नालासोपारा परिसरात वारंवार फिरत असल्याचे फिरण्याच्या मार्गावरील सीसीटीव्हीवरून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीचा नंबर प्राप्त केला. दुचाकी मालकाचा शोध घेतल्यावर त्यांची दुचाकी ३० एप्रिलला पहाटे ५ वाजता नायगांव रेल्वे स्टेशन परिसरात पार्क करून ते कामावर मुंबईला गेल्यावर चोरट्याने चोरी केल्याचे सांगितले. माणिकपूर पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
आरोपीने त्याच दुचाकीवरून चेन स्नॅचिंग केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा जाण्या-येण्याचा मार्गाचा शोध घेतल्यावर नालासोपारा रेल्वे स्टेशन मधील सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसून आला. पूर्वेकडील परिसरात स्टाफसह गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग केली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा चोरीच्या दुचाकीसह अग्रवाल फायर ब्रिगेड जवळ मिळून आल्याने दुचाकीसह ताब्यात घेतले. आरिफ शेख (२८) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे यापूर्वीचे जबरी चोरी, वाहनचोरी असे १३ गुन्हे दाखल असून तो सराईत आहे. त्यांड जेलमधून सुटून आल्यावर चौथ्या दिवशीच चोरी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, सुहास कांबळे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांत ठाकूर, अमोल कोरे, राज गायकवाड, प्रतीक कोडगे, अजित मैड, मसुब रामेश्वर केकान, अविनाश चौधरी यांनी केली आहे.