जव्हार : दिवाळी सुरू असतानाच १५ नोव्हेंबर रोजी रात्री जव्हार तालुक्यातील खर्डीपाडा गावाजवळील लेंडी नदीवर जामदा डोहाजवळ रात्रीची पार्टी करताना नितेश गावितचा गुडघाभर पाण्यात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दारूच्या पार्टीत त्याच्याच मित्रांनीच नितेश गावितचा खून केल्याचा आरोप नितेशचे वडील शिक्षक नानू गावित यांनी केला आहे. मात्र नितेशचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची नोंद जव्हार पोलीस ठाण्यात केली असून जव्हार पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
जव्हार तालुक्यातील सारसून (खर्डीपाडा) गावातील जि. प. शिक्षक नानू गावित यांचा २५ वर्षीय मुलगा नितेश हा १५ नोव्हेंबरच्या दिवशी वडोली येथे सासरवाडीला गेला होता. मात्र त्याच संध्याकाळी रात्री ११ वाजेच्या सुमारास नितेशला त्याच गावातील त्याच्या सहा मित्रांनी लेंडी नदीवर जामदा डोहाजवळ पार्टी करण्यासाठी बोलावले. त्यानंतर त्या मित्रांची पार्टी उशिरापर्यंत चालली, असे नदीजवळील झोपडीत राहणाऱ्या काही लोकांनी सांगितले.पार्टी झाल्यावर नितेश सासरवाडीला निघाला होता असे त्याच्या मित्रांनी सांगितले, मात्र नितेशचा मृत्यू पार्टीच्या अंतरापासून १ कि.मी. दूर नदीच्या डोहात आढळला. दरम्यान, याबाबत मित्र म्हणतात की, आम्ही नशेत होतो आम्हाला माहीत नाही काय झाले ते, तर पार्टीच्या ठिकाणी नितेशचे पैशांचे पॉकेट, बाईकची चावी, चप्पल सापडले आहेत. त्यामुळे नितेश गावितचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला नसून त्याचा खून केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या घटनेची कसून चौकशी करावी व आरोपींना अटक करावी, अशी मागणी होत आहे.