लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- घरफोडी, चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल करून ४ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली आहे.
नायगावच्या वाकीपाडा रामधाम आश्रम समोर महादुर्गा वेल्फेअर सोसायटीत राहणाऱ्या मालती यादव यांच्या घरी २५ सप्टेंबरला चोरट्याने घरफोडी केली होती. घरातील कपाटातून सोन्याची अंगठी, सोन्याचे मणी, घड्याळ असा २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये सतत होणाऱ्या घरफोडी चोरींचे प्रमाण वाढत असल्याने घरफोडी चो-यांवर आळा घालण्याचा सूचना वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने घडणा-या घरफोडी चोरीच्या गुन्हयाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून माहीतीचे व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस घेत होते. त्यानुसार नायगाव पोलीस ठाण्यातील घरफोडी चोरीच्या गुन्हयांतील आरोपीच्या नावाची उकल करुन सापळा रचुन आरोपी धिरज गुलाब मौर्या (२०) याला ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास केल्यावर सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडे तपासादरम्यान आयुक्तालयातील घरफोडीचे व ईतर चोरीचे असे ५ गुन्हे उघड केले आहे. अटक आरोपीकडुन उघडकीस आणलेल्या ५ गुन्हयातील ४ लाख ९४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार संजय नवले, रमेश भोसले, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे, सायबर शाखेचे संतोष चव्हाण, म.सु.ब. अविनाश चौधरी, रामेश्वर केकान यांनी केली आहे.