(मंगेश कराळे)
नालासोपारा : घरफोडी करणारे दोन आरोपी आणि प्लास्टिक चोरणारा एक आरोपी अशा तीन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी गुरुवारी दिली आहे.
विरार फाट्याच्या नालेश्वरनगर येथील औरंगजेब मनिहार (२७) हे २३ जुलैच्या रात्री घरात झोपलेले असताना चोरट्यांनी १ लाख २७ हजार ७०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केले. मांडवी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने गुन्हयाचा समांतर तपास करत तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन आरोपी अमिन अब्दुल रज्जाक शेख (२६) आणि प्रफुल्ल संग्राम गायकवाड (३२) या दोघांना २५ जुलैला ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयातील १ लाख १० हजार ७०० रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने हस्तगत केले. अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेविरुध्द घरफोडी, रिक्षा चोरीसारखे १० पेक्षा जास्त गुन्हे रत्नागिरी, मुंबई शहर, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
नालासोपाऱ्याच्या चॅम्पीयन कंपाउंड, चौधरी वजन काटा येथे पारसमल जैन (५५) यांचा प्लॅस्टिक दाना बनवण्याची कंपनी आहे. या कंपनीत काम करणारे कामगार मोहम्मद तसरीफ, रामू आर्या व विठू यादव या तिघांनी सोमवारी रात्री कंपनीत तयार करून ठेवलेला २ लाख १६ हजार रुपये किमतीचा प्लास्टिक दाना माल परस्पर चोरी करून नेला होता. मंगळवारी पेल्हार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने गुन्हयाचा समांतर तपास करत आरोपी जितु सोनी (३५) याला २५ जुलैला गुन्हयातील मुद्देमाल व गुन्हा करणे करीता वापरलेले वाहन अशा एकूण ७ लाख ८९ हजार ३०० रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, मसुब सागर सोनवणे, गणेश यादव तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.