मंगेश कराळे -
नालासोपारा :- मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला वसईच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी ४ गुन्ह्यांची उकल करून चोरी करण्यासाठी वापरलेली रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.
गिरीज तलावाजवळील भंडारी सामाजिक विश्वस्त संस्थेच्या हनुमान मंदिरात ८ ऑक्टोबरला रात्री लाकडी दरवाज्याचा कडी कोंडा तोडुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन गाभाऱ्यातील दानपेटी चोरट्यांनी फोडून चार हजार पाचशे रुपयाची रक्कम चोरून नेली होती. या चोरी प्रकरणी आशिष राऊत यांनी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वसई पोलीस ठाणे हद्दिमध्ये मागील काही दिवसामध्ये घरफोडी व चोरीच्या गुन्हयामधील वाढत्या प्रमाणामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे दोन पथके तयार केली.
सदर मंदीरातील तसेच घटनास्थळाचे आसपासचे सीसीटीव्ही चेक केल्यावर एक इसम हा स्वत:च्या तोंडाला कपडयाच्या सहाय्याने बांधुन डोक्यावर टोपी घालुन आपली ओळख लपवुन चोरी करण्याकरीता आला असल्याचे दिसुन आले. तसेच मंदीराबाहेरील सीसीटीव्ही चेक केल्यावर हा एका रिक्षामध्ये बसुन जात असल्याचे दिसुन आले. सदर रिक्षाबाबात चौकशी केल्यावर ती रिक्षा ही वालीव येथुन चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या दोन टिम तयार करुन एक टिम घटनास्थळ ठिकाणी व दुसरी टिम रिक्षा चोरीच्या घटनास्थळी वालीव येथे जावुन सीसीटीव्हीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हातील आरोपीचे नाव निष्पन्न करुन आरोपी शाबीर ऊर्फ फतेह मुर्तजाअली शेख (२६) याला धानिवबाग येथुन सापळा रचुन ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केल्यावर गुन्हातील त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने अटक करण्यात आली आहे. त्याचेकडे अधिक तपास केल्यावर आरोपीने गुन्हयात वापरेलेली रिक्षा वालीव येथून चोरली असुन त्याने वसई व माणिकपुर हद्दीमध्ये मंदीर व चर्चमध्ये अशाच प्रकारे दानपेटीतुन पैसे चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेे. आरोपीकडुन ५० हजार रूपये किंमतीची रिक्षा तसेच मंदीर व चर्चमधून चोरी केलेली ४ हजार ९६ रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुली-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांचे मार्गदर्शनाखाली वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) अब्दुलहक देसाई, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस हवालदार सुनिल मलावकर, मिलींद घरत, सुर्यकांत मुंढे, अक्षय नांदगावकर, सौरभ दराडे, प्रशांत आहेर यांनी केलेली आहे.