लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी वाहन चोरी, घरफोडी करणाऱ्या आई मुलांसह दोन तरुण असे चार आरोपींना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी १७ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वालीव फाटा येथील मांडवादेवी वसाहतमध्ये राहणाऱ्यांच्या घरी ३१ ऑगस्ट २०२२ साली रात्रीच्या वेळी चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा ४६ हजारांचा मुद्देमाल चोरी केला आहे. वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषगांने वालीव ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी राजु कैलास जैस्वाल, अजीत संदीप साहु, शिला कैलास जैस्वाल आणि नवनीत दिलीप विश्वकर्मा ऊर्फ रावण या चौघांना ताब्यात घेवुन तपास केला. आरोपीने गुन्हा संगनमताने केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हात अटक केली आहे. अधिक तपास केला असता अटक आरोपीने वालीव येथील १६ व पेल्हार येथील १ असे १७ गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून १७ गुन्हयातील एकुण ५ लाख ५१ हजार ६०८ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले- श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांचे मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळु कुटे, विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी केलेली आहे.