मंगेश कराळे
नालासोपारा - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला उत्तरप्रदेशातून पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे. १४ नोव्हेंबरला रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीला तिच्या राहते बिल्डींगचे खाली असलेल्या किराणा दुकानातुन साखर घेवून घरी येत असताना एका आरोपीने ९ वर्षीय पीडित मुलीला तेरी मम्मी तुझे आवाज दे रही है असे खोटे बोलुन तिचे तोंड दाबुन तिला खेचत आडोश्याला नेऊन तिचेवर लैंगिक अत्याचार करुन घटनास्थळावरुन पळुन गेला होता. सदर बाबत तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर संवेदनशील घटनेची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपी निष्पन्न करुन अटक करणे बाबत सूचना दिल्या होत्या.
दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखेचे ३ पोलीस पथके तयार करुन गुन्ह्यातील आरोपीचा तांत्रीक विश्लेषण व माहिती प्राप्त करुन आरोपी विशाल कनोजिया (२३) याला २५ नोव्हेंबरला वाराणसी शहरातून गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने, एस.टी.एफ. यांचे मदतीने ताब्यात घेवुन अटक केली. आरोपीचा ट्रान्झीट रिमांड घेवुन त्याला पुढील कारवाईसाठी तुळींज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मुकेश तटकरे, सचिन घेरे, मनोज सकपाळ, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, युवराज वाघमोडे, म.सु.ब. गणेश यादव, सागर सोनवणे, प्रविण वानखेडे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी पार पाडली आहे.