मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा : दुचाकी व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून सहा गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.
माणिकपूर येथे राहणारे उमेश गजानन मोरे (४५) यांची १५ ऑगस्टला रात्री अग्रवाल येथील के. मुव्ही स्टार गेटच्या समोर पार्किंग केलेली दुचाकी चोरीला गेली होती. माणिकपूर पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. माणिकपुरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बातमीदार व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने सापळा रचून वसई परिसरातुन आरोपी लहु लक्ष्मण राठोड (३८) याला ताब्यात घेतले. तपास केल्यावर त्याने गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली. आरोपीकडे अधिक तपास केल्यावर इतर ठिकाणी चोरी केलेले २ मोबाईल व ५ दुचाकी असा १ लाख ४७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. माणिकपूर पोलिसांनी अभिलेखावरील ६ गुन्हे उघडकीस केले आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलिंद साबळे, पोलीस उपनिरीक्षक सनील पाटील, पोलीस हवालदार शैलेश पाटील, धनंजय चौधरी, शामेश चंदनशिवे, प्रविण कांदे, गोविंद लवटे, आनंदा गडदे यांनी केली आहे.