- मंगेश कराळे
नालासोपारा - आचोळे पोलिसांनी दुचाकी व सायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपी सलाहुद्दीन खान, बिपीन राय, जिशान खान आणि अविनाश वाल्मिकी यांना दुचाकी चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि चार भंगार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेले आरोपी दुचाकी चोरून भंगार विक्रेत्यांना विकायचे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच सायकल चोरी करणाऱ्या भरत वाघारी याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून १२ सायकल जप्त केल्या आहेत. आरोपी भरत वाघरी हा सायकल चोरून भंगार माफिया मोहसीन युनूस मलिकला विकायचा. त्यानंतर मोहसीन सायकलमध्ये फेरफार करून मोठया किमतीत विकायचा. पोलिसांनी ६ आरोपींना अटक करून लाखो रुपयांचा माल जप्त करत ५ गुन्ह्यांची उकलल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
गालानगर भागात भरतकुमार पुरोहित (३५) यांनी बिल्डिंग समोर दुचाकी उभी केली असता, चोरट्याने दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वसई, नालासोपारा व आचोळे परिसरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली. हे गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आचोळे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुहास म्हात्रे, राजेश काळपुंड, दत्तात्रय दैगडे, डी.एस.पाटील, सतीश चव्हाण, विनायक कचरे आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आचोळे पोलिसांनी गस्त व तपासात जुन्या दुचाकी व लहान-मोठी वाहने चोरणाऱ्या आरोपींना अटक केली.
आरोपी भंगार व्यवसायिक सलाहुद्दीन खानने अलकापुरी, गालानगर, नालासोपारा परिसरातून दुचाकी व जुनी रद्दी वाहने चोरून भंगार म्हणून विकायचा. दुचाकी चोरणाऱ्या चार आरोपीकडून २ लाख ३ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तीन गुन्ह्यांची उकल केली. तर सायकल चोरणाऱ्या दुकलीकडून ६१ हजारांच्या १२ चोरीच्या सायकली जप्त करून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे.