लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- बँकेची बनावट एनओसी तयार करून लोनवरील महागड्या कार परराज्यात विक्री करणाऱ्या ७ आरोपींच्या अंतरराज्य टोळीला अटक करण्यात आचोळे पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीकडून आचोळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी विविध राज्यातून २ करोड ३४ लाखांच्या १२ महागड्या कार जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
आचोळे रोड परिसरात राहणारे जगदीश माळी यांना आरोपीने किराणा दुकानाच्या व्यवसायासाठी २ कोटीचे कर्ज मंजूर करून देतो असे सांगून त्यांच्या व्यवसायाची माहिती, दुकानाची कागदपत्रे घेत त्यांचा विश्वास संपादन करून विविध बँकेचे कर्ज मंजूर करण्यासाठी त्यांचे बँक ऍप्लिकेशन फॉर्म भरून घेतले. आरोपीने त्यांची कागदपत्रे महागड्या कार खरेदी करण्यासाठी बँकेत जमा करून जगदीश माळी आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर खरेदी केले. बनावट कागदपत्रे व बनावट मेलद्वारे बँकेचे वेगवेगळ्या कर्ज मंजूर करून महागड्या कार त्यांच्या ताब्यात न देता त्यांची एकूण २ करोड ८४ लाख ४९ हजार रुपये इतक्या रकमेची फसवणूक केली आहे. त्यांनी आचोळे पोलीस ठाण्यात हकीकत सांगितल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यावर फसवणूक करणारी अंतरराज्य टोळी असण्याची दाट शक्यता असल्याने आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आचोळे पोलिसांना सूचना दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी, अंमलदार हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे पाहिजे आरोपींचा शोध घेत होते.
गुन्ह्यातील मुख्य आरोपी राहुल शहा हा स्वतःचे अस्तित्व लपवून पुरावे नष्ट करून बनावट आधारकार्ड व त्यावर स्वतःचे नाव बदलून कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली व नेपाळ अश्या वेगवेगळ्या राज्यातील आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य करीत होता. आरोपी राहुल हा पवईतील मेलुहा द फर्न या हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला तेथून ताब्यात घेतले. आरोपी तेथे सुरेश भगत या नावाचे बनावट आधारकार्ड देत वास्तव्य करत होता. आरोपीकडून वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे असलेली ८ सिमकार्ड, नेपाळचे १ सिमकार्ड, २ लॅपटॉप, १ आयपॅड, ९ मोबाईल, ३ बनावट आधारकार्ड, फेडरल व टीएनबी बँकेच्या बनावट एनओसी मिळून आले. त्याने जगदीश माळीच्या नावावर १२ महागड्या कार परराज्यात विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. आचोळे पोलिसांनी राहुल उर्फ सचिन उर्फ सौरभ शहा, विजय सिंग, भिकाजी उर्फ उमेश गोपाळे, मोहम्मद नजर खान, प्रवीण उर्फ राणू जैन, आकाश मुसळे आणि विवेक करंडे या सात आरोपींना अटक करून २ करोड ३४ लाख ५३ हजार ३०२ रुपये किंमतीच्या १२ महागड्या कार जप्त केल्या आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार , पोलीस निरीक्षक (गुन्हे) विवेक सोनवणे, पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, तपास पथकाचे सपोनि यशपाल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुहास म्हात्रे, पोलीस हवालदार दत्ताराम दाईगडे, शंकर शिंदे, प्रशांत सावदेकर, निखिल चव्हाण, विनायक कचरे, अमोल सांगळे, मोहनदास बंडगर, मनोज पाईकराव, अमोल बरडे यांनी केली आहे.