पारोळ : जूचंद्र वीजउपकेंद्राने ६६ वीजचोरांवर धाडी टाकून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई जूचंद्र शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता सतीश सुरे व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत ५५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ६९ हजार ३९० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत ३ सुरक्षा रक्षक आणि वीजचोरी शोध पथक यांचा समोवश असून यापुढेही कारवाईचे सत्र सुरूच राहील, अशी माहिती वीज उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता सुरे यांनी दिली. या कारवाईने वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.
सध्या वसई तालुक्यात वीज चोरीचे प्रमाणवाढले आहे. वीज विभागाच्या निदर्शनास येणार नाही अशा पद्धतीने ही वीजचोरी करण्याचे कारनामे सुरू आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वीज मिटरमध्ये फेरफार करून त्यातून वीजचोरी सुरू आहे तर काहीजण मुख्य लाईनवरच आकडा टाकून वीज चोरी करीत आहेत. याबाबत वीजउपकेंद्राला कुणकुण लागताच त्यांनी धाड टाकून ६६ जणांवर कारवाई केली.
इथे झाली कारवाई...नायगाव पूर्वेतील वाकीपाडा, वाघरालपाडा, विकाससिटी, हसोबानगर व जुचंद्र परिसरात वीजपथकाने ही कारवाई केली. तसेच मागील २ वर्षात वेळोवेळी १७५ वीजचोरांवर कारवाई करून सुमारे २३ लाख ३८ हजार ३२९ रूपयांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. तसेच १४६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०१८ साली बऱ्याच वीज ग्राहकांची रिडींगप्रमाणे वीजदेयके येत नव्हती. अशा मोठमोठ्या बिल्डर्सला नियमित वीजदेयक देऊन त्याची वसुली केली.