- आशिष राणेवसई : आनंदनगर येथील गिरीविहार सोसायटी संकुलात नर्सिंग व मॅटर्निटी होम नोंदणीच्या नावाखाली अवैधपणे संसर्गजन्य (क्षयरोग) हॉस्पिटल चालवून रुग्णांची लूट करणाऱ्या ‘ब्रेथ केअर हॉस्पिटल’ या डॉ. धर्मेंद्र दुबे संचलित हॉस्पिटलवर वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य खात्याने कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानंतर या हॉस्पिटलवर कारवाई केली आहे. वसई-विरार महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मनपाच्या प्र-वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी ‘लोकमत’ला दिली. तक्रारदार नितांत राऊत यांनी माहिती दिल्यानुसार, वसई रोडस्थित गिरीविहार सोसायटी या निवासी संकुलातील जागेत डॉ. योगेंद्र रवी यांच्यानावे नोंदणी केलेले ब्रेथ केअर हॉस्पिटल हे संसर्गजन्य श्वसन व क्षयरोगावर उपचार करणारे हॉस्पिटल भाडेकरारावर श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र दुबे यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय व इतर आवश्यक परवानगीशिवाय चालू केले होते. या हॉस्पिटलमध्ये श्वसनरोगासंबंधित गंभीर संसर्गजन्य आजाराचे रुग्णही दाखल करून घेतले जात होते. यामुळे सोसायटी तसेच परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.या हॉस्पिटलसंदर्भात गिरीविहार सोसायटीने वारंवार आक्षेप घेऊनही हे हॉस्पिटल बंद न करता उलट सोसायटीतील पदाधिकाऱ्यांवरच वारंवार खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करून, पालिकेच्या काही अधिकाऱ्य़ांना हाताशी धरून हे अवैध हॉस्पिटल आजतागायत सुरूच ठेवण्यात आले होते. एवढेच नव्हे, तर कोविड काळातही पालिकेच्या परवानगीशिवाय हे हॉस्पिटल अविरत सुरूच होते. मात्र सोसायटी पदाधिकाऱ्यांनी आपला पाठपुरावा राज्य सरकारदरबारी सुरूच ठेवला होता. अखेर उशिरा का होईना, या पाठपुराव्यास शेवटी यश आले आणि हॉस्पिटलची नोंदणी रद्द केली. वादग्रस्त मुख्य अग्निशमन दल अधिकारी दिलीप पालव यांची भूमिका या रुग्णालयप्रकरणी संशयास्पद आहे. डॉ. धर्मेंद्र दुबे व पालिकेच्या अग्निसुरक्षेसंबंधात कोणतेही निकष न पाळताही अग्निसुरक्षा प्रमाणपत्र दिले गेले. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.- नितांत राऊत, तक्रारदार, सचिव, गिरीविहार गृहनिर्माण संस्था, वसई वसईतील ब्रेथ केअर हॉस्पिटलबाबतच्या तक्रारीसंदर्भात आयुक्तांना कारवाईसाठी सांगण्यात आले आहे. अजूनही कारवाई झाली नसेल, तर लागलीच मी स्वतः माहिती घेतो. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
अखेर वादग्रस्त ब्रेथ केअर हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा; नोंदणी होणार रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 8:57 AM