नालासोपारा : वसई-विरार महानगरामधील बोगस डॉक्टरांविरुद्धची महापालिकेची कारवाई सध्या थंडावली आहे. त्यामुळे या डॉक्टरांची दुकानदारी जोरात पुन्हा सुरु झाली आहे. परंतु महापालिकेचा आरोग्यविभाग मात्र ती जोरात सुरु असल्याची ग्वाही देत आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर आरोग्य विभागाने नालासोपारा येथे काही दिवसांपूर्वी भोंदू डॉक्टर शोधमोहिम घेऊन अशा सहा डॉक्टरांवर कारवाई केली होती. मात्र आता ही शोधमोहिम पुन्हा मंदावल्याने परागंदा झालेले बोगस डॉक्टर शहरात पुन्हा सक्रीय झाले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे याबाबत चौकशी केली असता आमची ही मोहिम अजुनही सुरूच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.वसई विरार व नालासोपारा शहरातील अनेक भागात भोंदू डॉक्टरांनी आपले दवाखाने थाटले आहेत. या बोगस डॉक्टरांकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नाही. धक्कादायक बाब म्हणजे रूग्णांच्या जिवीतास धोका निर्माण होतील अशा कालबाह्य व अपायकारक औषधांचा हे भोंदू डॉक्टर रूग्णांवर मारा करीत असतात. अशा सहा बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल केले होते. यानंतर अनेक बोगस डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केले होते. नागरिकांनाही बोगस डॉक्टरांवर चाप बसला असे वाटले. मात्र पालिकेची मोहीम पुन्हा थंडावल्यामुळे हे बोगस डॉक्टर पुन्हा आपले दवाखाने थाटून रुग्णांच्या जीवांशी खेळत आहेत.महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र चव्हाण यांनी बोगस डॉक्टरविरोधातील पालिकेची शोधमोहिम मंदावली नसून, प्रत्येक महिन्यात आमचे आरोग्य पथक त्यावर काम करीत आहे. बोगस डॉक्टरविरोधात तक्रार आल्यास आंम्ही तात्काळ त्यावर कारवाई करू असे सांगत असून शोधमोहिम थंडावल्याचा मात्र त्यांनी इन्कार केला.डॉक्टर बोगस : औषधे, इंजेक्शनेही बोगसपालिकेच्या आरोग्य विभागातील पथकाने गेल्या महिन्यात छापा टाकल्यानंतर या भोंदू डॉक्टरांचे प्रताप पाहून वैद्यकीय अधिका-यांना धक्का बसला. या डॉक्टरांकेडे कुठल्याच प्रकारची पदवी नव्हती. त्यांचे शिक्षणही पूर्ण झालेले नव्हते.बंदी असलेली, कालबाह्यझालेली औषधे, जिवितास धोका निर्माण करणारी इंजेक्शने भूल देण्याची, सुन्न करणारी घातक औषधे या डॉक्टरांच्या दवाखान्यात होती. त्यांचा वैद्यकीय शिक्षणाचाही काहीही संबंध नव्हता तरी ते अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करून रुग्णांच्या जीवाशी खेळत होते.गेल्या महिन्यात नालासोपा-यात बोगस डॉक्टरांवर केली होती कारवाईशहरातील बोगस डॉक्टरांविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार मोहीम उघडली होती. त्यावेळी नालासोपारा येथून ६ बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली. त्यापैकी एक डॉक्टर पळून गेला. या डॉक्टरांकडे कुठल्याच प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नव्हते आणि बंदी असलेली, हानीकारक औषधे ते रुग्णांना देत असल्याचे आढळून आले. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी होणे आवश्यक असते. मात्र अशा नोंदणीशिवाय हे डॉक्टर व्यवसाय करीत होते.
डॉक्टरांविरुद्धची कारवाई थंड, रुग्णांचे प्राण धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 3:51 AM